पुणे : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील युती फुटल्याने शिवसेनेने जल्लोष केला़ भाजपामधील अनेकांचा जीव भांड्यात पडला़ त्याच वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीची चर्चा लांबत चालल्याने आपल्या तिकिटाचे काय होणार, या चिंतेने दोन्ही पक्षांतील इच्छुकांच्या जीव टांगणीला लागला आहे़ मागील महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्येच लढत झाली होती़ त्यामुळे हे प्रभाग आपल्याकडे हवेत, अशी दोन्ही पक्षांची मागणी आहे़ आघाडीची चर्चा सुरू होण्यापूर्वी अनेकांना पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याने त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे़ पण, अचानक आघाडीची चर्चा सुरू झाली़ आघाडीसाठी अजित पवार हे स्वत: इच्छुक असल्याने काँग्रेससाठी आणखी काही जागा सोडण्याची तयारी दाखविली जात आहे़ परंतु, काही जागांबाबत दोन्ही पक्ष आग्रही आहेत़ आपल्या जागेबाबत दोन्ही पक्ष आग्रही असल्याचे समजल्याने दोन्ही पक्षांतील इच्छुकांचे मात्र धाबे दणाणले आहे़ त्यांनी प्रचार थांबवून वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे़ मधूनच एखाद्या समर्थकांचा फोन येत असे़ तो ‘आपले तर तिकीट फिक्स आहे ना?’ असे विचारी तेव्हा त्याला सांगताना इच्छुकांना तारेवरची कसरत करावी लागे़ रात्री उशिरापर्यंत आघाडीच्या बैठकीत नेमके काय ठरले? आपला प्रभाग कोणाला सुटला? याची खात्री त्यांच्याकडून केली जाई़ दुसरीकडे, ज्यांना आपण ‘प्रचाराला लागा’ असे सांगितले, त्यांनाच आता ‘थांबा आणि वाट पाहा,’ असे सांगण्याची वेळ दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांवर आली आहे़
आघाडी लांबल्याने जीव टांगणीला
By admin | Updated: January 31, 2017 04:20 IST