बारामती : शिवसेनेने भाजपाबरोबर युती तोडल्याने आता बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येऊन निवडणूक लढविणार आहे. मात्र, निंबूत - करंजेपूल या एका जिल्हा परिषद गटामध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन भाऊबंदकी जपणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात शेतकरी कृती समिती, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अध्यक्ष सतीश काकडे यांनी आज हे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निंबूत-करंजेपूल गटातील इच्छुकांना डावलून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखविला आहे. काकडे हे शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांचे पुतणे आहेत. त्यावर स्पष्टीकरण करताना सतीश काकडे यांनी सांगितले, की कारखान्याची निवडणूक आम्ही दोघांनी एकत्र पॅनल करून लढविली आहे. त्यामुळे प्रमोद काकडेंच्याबाबत आमची वेगळी भूमिका राहणार आहे. अन्य गट, गणांमध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसच्याविरोधात निवडणूक लढवणार आहे.यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, शिवसेनेचे नेते जलसंपदा, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत एकत्र बैठक रविवारी (दि. २९) होणार आहे. त्यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. सध्या या आघाडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, शेतकरी कृती समितीसह इतर पक्षदेखील सहभागी होणार आहेत. मात्र, याबाबत रविवारी होणाऱ्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल. सध्या या आघाडीचे सुपे, शिर्सुफळ, सांगवी, माळेगाव, वडगाव या गटांमध्ये उमेदवार निश्चित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रमोद काकडे यांना पाठिंबा देण्याचे धोरण आहे. प्रमोद काकडे यांनी आपल्यासमवेत सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकत्र काम केले आहे. त्यांना वैयक्तिक पाठिंबा देण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला हा पाठिंबा नाही. या आघाडीचे नाव, सहभागी इतर पक्षाबाबत रविवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे, असे काकडे यांनी सांगितले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण, तालुकाध्यक्ष महेंद्र तावरे आदी उपस्थित होते.
युती तोडल्यानंतर शिवसेना, स्वाभिमानी एकत्रित लढवणार
By admin | Updated: January 28, 2017 00:12 IST