लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एखाद्या बाबाच्या अंगात दैवीशक्ती असून त्याने कोणत्याही देवदेवतांच्या नावाने ताईत, यंत्र, सुरक्षा कवच निर्माण करून त्याची जाहिरात करून विकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. महाराष्ट्र जादूटोणा कायदा-२०१३ अंतर्गत अशा जाहिरातींचे कोणत्याही प्रसारमाध्यमातून प्रसारण करणे बेकायदेशीर असल्याचे मत उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या निकालामुळे या जाहिरातींना आता पायबंद बसणार आहे.
एखाद्या अभिमंत्रित केलेल्या यंत्रातल्या काही खास चमत्कार घडवून आणणाऱ्या दैवीशक्तींमुळे मनुष्याच्या जीवनात आनंद निर्माण होईल, व्यवसायात बरकत येईल, नोकरीत प्रगती होईल, उज्ज्वल कारकीर्द, शैक्षणिक उन्नती, आजारपणातून मुक्तता असे दावे करणाऱ्या जाहिराती व त्यांचे प्रसारण या महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाविरोधी कायदा, २०१३ चे कलम ३ अन्वये बेकायदेशीर असल्याचा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एम. जी. सेवलीकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय ५ जानेवारीला दिला.
सन २०१५ मध्ये दाखल या याचिकेत केंद्र व राज्य सरकारसह ॲडव्हर्टायझिंग कौन्सिल व विविध टीव्ही चॅनेल्ससह या जाहिरातीत काम करणाऱ्या काही कलाकारांना प्रतिवादी करण्यात आले होते. या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने आपल्या सत्तावीस पानी निकालपत्रात यासंबंधी सर्व कायद्यातील तरतुदींचा उहापोह केला. जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देत केंद्र व राज्य सरकारला सक्षम अधिकाऱ्यांचा स्वतंत्र कक्ष स्थापन करून अशा जाहिराती तातडीने थांबण्याचे सक्त आदेश दिले आहेत. या जाहिरातींचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिन्या व प्रसारमाध्यमांवर कारवाई करून त्याचा अहवाल केंद्र व राज्य शासनाने न्यायालयास एक महिन्यात द्यावा लागणार आहे.
चौकट
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी मैलाचा दगड ठरावा असा हा निर्णय आहे. फसवणूक करून सामान्य जनतेचे जे शोषण या जाहिरातींमधून केले जाते त्याला औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयाने चाप बसेल अशी अपेक्षा आहे. या निर्णयाची कठोर अंमलबजावणीसाठी अंनिस प्रयत्नशील राहील.
-डॉ. हमीद दाभोलकर, अंनिस कार्यकर्ता