पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून वैद्यकीय हलगर्जीपणा (मेडिकल निग्लिजन्स) झाला आहे की नाही, याबाबत चौकशी करण्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडे सर्व कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली होती.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सूर्या हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल, इंदिरा आयव्हीएफ सेंटरमधील रुग्णांची कागदपत्रे, रुग्णाची वैद्यकीय पार्श्वभूमी, डॉक्टरांचे, रुग्णालय प्रशासनाचे आणि कुटुंबीयांचे जबाब आदी सर्व बाबींची ससूनच्या समितीकडून तपासणी करण्यात आली. त्यानुसार अहवाल वैद्यकीय शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासनाला पाठवण्यात आला आहे. मात्र, अहवालामध्ये रुग्णालय किंवा डॉक्टरांचा दोष असल्याचा कोणताच स्पष्ट उल्लेख केला नसल्याचे पोलिस प्रशासनाने ससूनच्या समितीकडे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तनिषा यांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत, असा गंभीर आरोप भिसे कुटुंबाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर केला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी ससून रुग्णालयाने केली आहे. ससूनचा अहवाल समोर आला असून त्यात अनेक गंभीर बाबींचा समावेश आहे.
काही प्रमुख निष्कर्ष समोर
ससून रुग्णालयाच्या चौकशी समितीच्या अहवालातील काही प्रमुख निष्कर्ष समोर आले आहेत. तनिषा यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसताना देखील इंदिरा आयव्हीएफमध्ये ४-५ दिवस दाखल करून घेणं ही चूक होती. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे स्पष्ट झाले असताना तनिषाला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी रेफर करणे गरजेचे होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा यांना उपचाराविना पाच तास थांबवले होते. मात्र, यावेळी पैसे घेतले की नाही किंवा उपचारास नकार देण्यामागे नेमके हेच कारण होते का? पैसे द्या, नाही तर उपचार करणार नाही, असे प्रश्न चौकशी समित्यांसमोर होते. याबाबत आरोग्य उपसंचालकांनी चौकशी करून अहवाल सादर केला आहे. तनिषा यांना सूर्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांची प्रसूती झाली. मात्र, रुग्णालयात कोणतीही कार्डिॲक स्पेशालिटी सुविधा उपलब्ध नव्हती. रुग्णाला हृदयविकाराचा धोका वाढला होता. त्यामुळे जवळपास दोन तास सीपीआर देण्यात आला. तनिषाची वैद्यकीय परिस्थिती गुंतागुंतीची होती. तनिषा यांचा मृत्यू ‘मणिपाल’मध्ये झाला. हा मातामृत्यू असतानाही त्यांनी शवविच्छेदन केले नाही. ससून रुग्णालयाला त्यांनी मृत्यू झाल्यानंतर कळवणे गरजेचे होते; पण ते झालेले नाही. या सगळ्यात इंदिरा आयव्हीएफ सेंटरची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यांनी लवकर रेफर करायला हवे होते. असे ‘ससून’च्या चौकशी अहवालात नमूद असल्याचे समोर आले आहे.