----
अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पाच ते सहा मंगल कार्यालये आहेत. साखरपुडा व लग्न समारंभासाठी वऱ्हाडी मंडळी हजारोंच्या संख्येने हजेरी लावत असतात. त्याचप्रमाणे दशक्रिया विधी व अंत्यविधीसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. याकडे पोलीस व प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
अवसरी खुर्द येथे १५ ते २० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात भरत आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तालुका तहसीलदार व पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अवसरी फाटा, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर फाटा, पारगाव या गावामध्ये अंदाजे ७ ते ८ लॉन्स व मंगल कार्यालये आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लग्न समारंभासाठी फक्त २०० वऱ्हाडी मंडळींनाच परवानगी दिली असताना वरील कार्यालयात साखरपुडा व लग्न समारंभासाठी वऱ्हाडी मंडळी हजारोंच्या संख्येने हजेरी लावत असतात.
लग्न कार्यासाठी स्थानिक, पुणे, मुंबई व जिल्ह्यातून वऱ्हाडी मंडळी येत असतात. मंगल कार्यालयाचे मालक प्रशासनाचे कोणतेच नियम पाळत नसून मास्क व सॅनिटायझरचा वापर केला जात नाही. तोंडाला मास्क न लावता वऱ्हाडी मंडळी सर्रास फिरताना पाहावयास मिळत आहे. त्याचप्रमाणे लग्न कार्यानंतर डीजेच्या तालावर रात्रभर वरती चालू असतात. मंचर पोलीस स्टेशनला कळवूनदेखील कोणतीच कार्यवाही होत नाही. त्याचप्रमाणे दशक्रिया विधी व अंत्यविधीसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
---
आंबेगावच्या पूर्व भागात रुग्ण वाढले
तालुक्याच्या पूर्व भागात अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पारगाव, मेंगडेवाडी, कठापूर, मंचर आदी गावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी याकडे लक्ष द्यावे आणि मंचर पोलीस ठाणे व आंबेगाव तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना नियमांची काटेकोर अंमलबाजवणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत चालले असल्याने मंगल कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगी घेवून मंगल कार्यालयात शुभविवाह करण्यासाठी परवानगी द्यावी व यावर ग्रामपंचायत कार्यालयाचे लक्ष ठेवण्याचे आदेश तहसीलदारांनी द्यावेत व तसेच रात्रभर डीजेच्या तालावर चालणाऱ्या वरातींवर बंदी आणावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.