पुणे : मार्केट यार्डामध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेला किरकोळ विक्रीचा व्यवसाय तत्काळ बंद करण्यात यावा. असे न झाल्यास किरकोळ व्यापाऱ्यांच्या या आंदोलनात शेतकरी सहभागी होतील आणि आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला.शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आज मार्केट यार्डात नियमबाह्य किरकोळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचा विरोध करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी शेट्टी यांनी व्यापारी लॉबीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. म्हणून आम्ही १५ वर्षांच्या या जुलमी सरकारला उखडून फेकले. आता आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असलेले भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आहे. या सरकारकडून आम्हाला आमूलाग्र बदल अपेक्षित आहे. बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या मालासाठी स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, सध्या या समित्याच शेतकऱ्यांसाठी कत्तलखाने ठरत आहेत. सहकार आणि पणनमंत्री चंद्रकांत पाटील हे स्वच्छ चारित्र्याचे मंत्री आहेत. त्यामुळे मार्केट यार्डात सुरू असलेला बेकायदेशीर व्यापार ते बंद करतील, असा विश्वास मला वाटतो.’’या वेळी किरकोळ दुकानदार आणि पुणे जिल्हा व्यापारी महामंडळाने शेट्टी आणि खोत यांच्या उपस्थितीत मार्केट यार्डातील हमाल, व्यापारी व ट्रान्सपोर्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती मंदिरात महाआरती करून किरकोळ विक्र्रीविरोधात ‘खरेदी बंद’ आंदोलन सुरू केले. ‘मार्केट यार्डातील किरकोळ व्यापार बंद होत नाही, तोपर्यंत शहर व जिल्ह्यातील किरकोळ दुकानदार येथील किरकोळ विक्रीला पाठिंबा देणाऱ्यांकडून खरेदी करणार नाही,’ असे महामंडळाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सांगितले.या वेळी ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, मनसेचे जयराज लांडगे, महेश खोपडे, बाबा पंडित, राजू डांगी, आनंद बाफना, कै लास जोशी, किशोर सेठिया, काका देशमुख, गोपाळ लढ्ढा, अमोद शहा, सुनील गेहलोत, रामदास आगवणे, रमेश बिर्ला, नरेंद्र बोलदरा, अशोक चौधरी, दीपक मुळे, अरुण अडागळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
किरकोळ विक्री बंद न झाल्यास तीव्र आंदोलन
By admin | Updated: January 13, 2015 05:49 IST