भोसरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. त्यामुळे प्रचारासाठी कार्यकर्त्यांना सर्वाधिक मागणी आहे. प्रचारावेळी आपल्यामागे समर्थकांची मोठी संख्या दिसण्यासाठी कार्यकर्ते मिळविण्याची उमेदवारांना चिंता आहे. त्यासाठी ५०० रुपयांचा रोजगार, मोफत जेवण व फिरण्यासाठी पेट्रोल देण्याची तयारी उमेदवारांची आहे. तरी कार्यकर्ते मिळत नसल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे व अपक्ष उमेदवारांनी प्रचारास सुरवात केली आहे. आपण किती प्रबळ दावेदार आहोत, हे दाखवण्यासाठी प्रचारात कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी करावी लागत आहे. पाच वर्षातून एकदा निवडणूक होत असल्याने उमेदवार आपली सर्व शक्ती पणाला लावत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत कार्यकर्त्यांपेक्षा नेते अधिक झाले आहेत. त्यामुळे भाडोत्री कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवारांना प्रचार करावा लागत आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने कार्यकर्ते गोळा करून गर्दी करण्यासाठी अडचणी येत आहेत. मुलांच्या परीक्षा असल्याने पालक वर्ग ही प्रचारात सहभागी होण्यासाठी नकार देत आहे. त्यामुळे उमेदवारांना भाडोत्री कार्यकर्त्यांशिवाय प्रचार करणे अडचणीचे ठरत आहे. निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले अधिकारी शहरात फिरत आहेत. परंतु, त्यांना भाडोत्री कार्यकर्ते ओळखता येणे अडचणीचे आहे. मात्र, त्यांना दिला जाणारा पैसा कोणत्या खर्चात मांडला जातो, हा प्रश्न आहे. (वार्ताहर)
प्रचारासाठी हवे आहेत कार्यकर्ते!
By admin | Updated: February 9, 2017 03:27 IST