जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीतील अतिक्रमणे उद्यापासून (दि. ७) हटविण्याची धडक मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून समजते. याचे पडसाद आजच जेजुरीत उमटले असून, अनेकांनी अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे.जेजुरीत पालखी मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. येत्या १४ जुलै रोजी श्रीसंत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा जेजुरीत मुक्कामासाठी येत आहे. या पार्श्वभूमीवर पालखी महामार्गावरील सर्व अतिक्रमणे हटवून मार्ग मोकळा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे ही अतिक्रमणे हटवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत. आदेशानुसार जेजुरीतील लवथळेश्वर ते जुनी जेजुरीपर्यंतची पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. प्रशासनाने या संदर्भात जेजुरीतील हातगाडी, किरकोळ दुकाने, मिठाईवाले, टपरीधारक, फळविक्रेते आदींना अतिक्रमणे स्वत:च हटवावीत, असे आवाहन दवंडी देऊन केले होते.
जेजुरीत अतिक्रमणांवर होणार कारवाई
By admin | Updated: July 7, 2015 02:53 IST