पुणे : एसीबीकडे तक्रार न करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्याकडून घेतलेले ७० लाख रुपये परत देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सुरेश मारुती पवार (वय ६०, रा. हिलटॉप सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) असे आरोपीचे नाव आहे. यापूर्वी रविराज सुभाष डोंगरे (रा. चव्हाणनगर, धनकवडी), सुनील भगतसिंग चव्हाण (वय २४, रा. आंबेगाव पठार) आणि निरव रवींद्र शिर्के (वय २३, रा. बालाजीनगर, धनकवडी) या तिघांना अटक करण्यात आली होती. सध्या हे तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी विजय वसंतराव यादव (वय ४९, रा. उदय अपार्टमेंट, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. उपअभियंत्याने ७० लाख रुपये दिल्यामुळे त्याचे नाव एसीबीकडे देण्यात आले नव्हते. त्याच्याकडून घेतलेले ७० लाख रुपये द्यावेत, या मागणीसाठी यादव यांना त्रास देण्यात येत होता. या त्रासाला कंटाळून त्यांच्या आईने फिर्याद दाखल केली. याचा राग मनात धरून १५ सप्टेंबर रोजी दुपारी पवार आणि साथीदारांनी यादवच्या घरी जाऊन राडा घातला. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा तोडून नेला होता. त्याच्या फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी पवारच्या पोलीस कोठडीची सरकारी वकिलांनी केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली. (प्रतिनिधी)
खंडणीप्रकरणी आरोपीला कोठडी
By admin | Updated: September 25, 2015 01:36 IST