चाकण : वेतनवाढीच्या करारावर अंतिम निर्णय न झाल्याने संतप्त कामगारांनी येथील वेरॉक कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामगारांना अडवून बेकायदा गर्दी जमाव जमवून मशिनरींची तोडफोड केली होती. या प्रकरणी ७० ते ८० कामगारांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे गावच्या हद्दीतील या कंपनीत कामगार व व्यवस्थापन यांच्यात वेतनवाढ करार चालू होता. या करारवर अंतिम निर्णय न झाल्याने आज (दि. ५) सकाळी सात ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान कामगारांनी कंपनीच्या मुख्य दरवाजावर बेकायदा गर्दी जमाव केला व कामगारांना कामावर जाण्यास मज्जाव केला. तसेच कंपनीच्या असेम्बली डिपार्टमेंटमधील मशिनरींची तोडफोड केली.या प्रकरणी जगन्नाथ यादवराव देशमुख (वय ४५ , रा. साई ज्योती पार्क, रहाटणी, पिंपरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. दिनेश प्रल्हाद गायकवाड, प्रेमसिंग गुलाबसिंग गिरासे, भरत शिवाजी इथापे, किरण हरिभाऊ गावडे, नीलेश दत्तात्रय फेगडे, नीलेश धनंजय टेमकर, पवन पांडुरंग घडामोडे, दीपक निंबाजी पवार, राहुल सुधाकर पाटील, संतोष मोतीलाल माळी, दत्तात्रय जगन्नाथ पाटील, सारंग रावसाहेब गोळे, बजरंग परदेशी, प्रदीप बालाजी तांबे, अंकुश पोपट बोऱ्हाडे व राम पंढरीनाथ लहाने या कामगारांसह इतर ७० ते ८० कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
८० कामगारांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: August 6, 2015 03:45 IST