पुणे : महापालिकेच्या विविध विभागांमधील अनेक कामे कंत्राटी पद्धतीने पार पाडली जातात; मात्र १३ ठेकेदारांनी कंत्राटी कामगारांचा पीएफच जमा न केल्याने त्यांना पीएफ कार्यालयाने ६४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. महापालिकेकडून ठेकेदारांना किमान वेतन कायद्यानुसार प्रत्येक कामगाराच्या पगारापोटी १२ हजार रुपये अदा केले जातात. मात्र, ठेकेदारांकडून कंत्राटी कामगारांना १२ हजार रुपये पगार न देता ६ ते ७ हजार रुपये दिले जातात, पीएफ जमा केला जात नाही, अशा तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. पीएफ भरण्यास टाळाटाळ केलेल्या १३ ठेकेदारांना ६४ लाखांचा दंड ठोठावून त्यांच्याकडून तो वसूल केला आहे. पालिकेलाही ५ हजारांचा दंड सुनावण्यात आला आहे. या ठेकेदारांवर पालिकेकडूनही दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांनी सांगितले. रक्षक सिक्युरिटी, स्पायडर, नॅशनल सिक्युरिटी, श्री एंटरप्रायझेस, श्रीकृपा सर्व्हिसेस, हेमंत शहा, धनश्री सर्व्हिसेस, दिशा एजन्सी, संतोषी, अंबिका एंटरप्रायझेस आणि श्री गणेश एंटरप्रायझेस आदींवर कारवाई करण्यात आली आहे.
पीएफ न भरल्याने ६४ लाखांचा दंड
By admin | Updated: November 16, 2016 03:31 IST