लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “काका लोणंदचे एक तिकीट द्या. घरी जायचे आहे,” डोळे चोळत एका निरागस चिमुकलीने हडपसर येथे पीएमपीएल कंडक्टरकडे तिकिटाची मागणी केली. एकच तिकीट हवे आहे का, आईवडील कुठे आहेत, असा प्रश्न केला असता, “हो मी एकटीच आहे, मला घरी जायचे आहे,” असे तिने सांगितले. जागरूक कंडक्टरने अधिक चौकशी केल्यानंतर समजले की, या मुलीला फसवून पुण्यात आणले गेले होते. मात्र, तिने धिटाईने सुटका करून घेत घरी जाण्यासाठी पकडण्याचा प्रयत्न करत होती.
कंडक्टरने या मुलीला आगारात नेले. ती चुकली असावी, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, दोन तरुणांनी तिला बागेत खेळायला जाऊ असे सांगून लोणंद येथून (ता. खंडाळा, जिल्हा सातारा) हडपसरमध्ये पळवून आणल्याचे उघडकीस आले. पण, रडत न बसता त्या चिमुकलीने धीटपणा दाखवला.
वैष्णवी दत्तात्रय खंडागळे (६ वर्षे. रा. लोणंद, ता. खंडाळा, जिल्हा सातारा) असे त्या चिमुकलीचे नाव आहे. बस आगारात तिची चौकशी करताना बस आगारात गर्दी झाली. गर्दी बघून ‘सेव्ह द चिल्ड्रन’च्या प्रियांका नलावडे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रवीण प्रधान यांनी हडपसर पोलीस ठाणे गाठले. त्या वेळी तिने घडलेला प्रसंग पुन्हा कथन केला. त्यावेळी ती रात्रभर बस आगाराजवळच्या पदपथावर झोपली असल्याचे समजले.
सकाळी बस सुरू होताच ती लोणंदकडे निघाली होती. ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी तिने सांगितलेल्या माहितीची शहानिशा केली. लोणंद पोलीस ठाण्याच्या मागेच ती रहात असल्याची माहिती खरी ठरली. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात सापडली असून तिला लोणंद पोलीस ठाण्याकडे हवाली करीत असल्याची नोंद करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांनी सांगितले. त्यानंतर तिला एक महिला पोलीस कर्मचारी, नलावडे आणि प्रधान यांचे सहकारी यांनी एका खासगी गाडीने प्रवास करत लोणंदमध्ये नेऊन तिच्या नातेवाईकांडे सोपवले.
लोणंद पोलिसांनी चौकशी केली असता तिच्या आईवडिलांना मुलगी हरविले असल्याचेही लक्षात आले नव्हते. मुलीला ताब्यात देण्यासाठी आईवडिलांना बोलाविले असता ते घरी नव्हते. आजीआजोबांना बोलविण्यात आले. खात्री करूनच तिला त्यांच्याकडे सुपूर्त केल्याचे नलावडे यांनी ‘लोकमत’ला सांगिलते.
चौकट
आईवडील नको, शिक्षण हवे
“जसजसे घर जवळ येत होते तशी ती रस्त्यात लागणारी मंदिरे, दुकाने ओळखत होती. मला बागेत खेळायचे आहे. आईवडिलांकडे सोडले तर खेळता येणार नाही. म्हणून ती दुःखी होत होती. तर शाळेत जायचे आहे आईवडिलांकडे नको, असे ती सांगत होती. या माहितीवरून जर तिच्या आईवडिलांनी तिचा सांभाळ केला नाही तर संस्था तिची जबाबदारी घेईल,” असे प्रियांका नलावडे यांनी सांगितले.