पुणे : महापालिकेच्या स्वमालकीच्या एकूण २ हजार ५०० भूखंडांपैकी ४६१ भूखंड महापालिकेच्या दफ्तरी ‘नॉट डिफाइन’ या सदरात आहेत. या सर्व भूखंडांचे एकूण क्षेत्र तब्बल ५ कोटी चौरस फुटांचे असून, त्यांची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत अब्जावधी रुपये आहे.हे सर्व भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित झालेले आहेत. महापालिकेकडे त्याची फक्त हस्तांतर तेवढीच नोंद आहे. हस्तांतरित झाल्यानंतर, करावयाचे कायदेशीर सोपस्कार महापालिकेने केलेलेच नाहीत. त्यामुळे हे भूखंड ज्यांनी महापालिकेला दिले, त्यांच्याच नावावर किंवा कोणाच्याच नावावर नाहीत. त्याचा अनेकांकडून गैरवापर तर सुरूच आहे, त्याचबरोबर काही बांधकाम व्यावसायिक या भूखंडांच्या मूळ मालकांकडून मुखत्यारपत्र घेऊन त्याच्या काही भागांची परस्पर विक्रीही करीत आहेत. काही ठिकाणी त्यावर निवासी इमारतीही बांधल्या गेल्या आहेत. इतके होऊनही महापालिकेला त्याची काहीही माहिती नाही. हे भूखंड कायदेशीरपणे महापालिकेच्या नावावर करून घेण्याची प्रक्रियाच रखडली आहे. कारण, महापालिकेकडे या भूखंडाचे एकूण क्षेत्र, मूळ मालकी कोणाची, यासारखी कोणतीही कागदपत्रेच नाहीत.एरंडवणे, औंध, कर्वेनगर, गुलटेकडी, कात्रज, कोंढवा, धनकवडी अशा उपनगरांसह शहराच्या मध्य भागातील अनेक पेठांमध्येही हे भूखंड आहेत. त्यातील अनेक भूखंड थेट महापालिकेच्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजे, १९५० पासून हस्तांतरित झालेले आहेत. ते ज्या कारणांसाठी घेतले गेले त्यासाठी त्याचा वापर करणे दूरच; पालिका प्रशासन त्याच्या सातबाऱ्याच्या उताऱ्यावर पालिकेचे साधे नावही लावू शकलेले नाही. काही भूखंड महापालिकेकडे सोसायट्यांनी ‘ओपन स्पेस’च्या कायद्यानुसार हस्तांतरित झाले आहेत. त्याचीही कायदेशीर नोंद करून घेणे महापालिकेला जमलेले नाही. फक्त फाइलमध्येच नोंद असलेल्या या ४६१ भूखंडांपैकी सर्वाधिक भूखंड शाळा, उद्यान व रुग्णालयांसाठी आरक्षित आहेत. त्या खालोखाल टॉयलेट बॉक्स, वॉटर वर्क्स, पंपिंग स्टेशन, स्लॉटर हाऊस, टिंबर मार्केट अशा विविध कारणांसाठी हे भूखंड आरक्षित आहेत. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, महापालिकेला नागरिकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यासाठी जागा नाही. त्यातही उपनगरांमध्ये महापालिकेला जागांची सर्वाधिक गरज आहे. असे असतानाही या भूखंडांचा महापालिकेडून वापर केला जात नाही. वापरच होत नसल्यामुळे महापालिकेच्या मालकीचे हे भूखंड बेवारस पडून असून, त्याचा गैरवापर होत आहे. (प्रतिनिधी) महापालिका प्रशासनाची अनास्था- संत तुकारामनगर हौसिंग सोसायटी, संतनगर, पर्वती, पुणे यांनी सिटी सर्व्हे क्रमांक ३४६९ हा भूखंड सन १९८५ मध्ये महापालिकेकडे हस्तांतरित केला. - या सोसायटीच्या वतीने, तेव्हापासून पालिका प्रशासनाकडे त्यांनी या भूखंडावर आपले नाव लावून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, यासाठी पत्रव्यवहार केला जात आहे.- काही भूखंड महापालिकेकडे सोसायट्यांनी ‘ओपन स्पेस’च्या कायद्यानुसार हस्तांतरित झाले आहेत. त्याचीही कायदेशीर नोंद करून घेणे महापालिकेला जमलेले नाही.
पालिकेच्या ४६१ भूखंडांची चोरी!
By admin | Updated: November 8, 2015 03:07 IST