पुणे : डासांचे प्रमाण झपाटयाने वाढल्याने दि. १ ते २० जुलै या अवघ्या २० दिवसांच्या कालावधीत शहरात डेंगीचे तब्बल ३४८ रुग्ण तर मलेरियाचे ९६ रुग्ण सापडले आहे. या आकडेवारीवरून शहरात डेंगीचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र त्यानंतरही पुणे महापालिका या आजाराबाबत अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.दोन वर्षापूर्वी शहरात डेंगीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेली स्थिती यावर्षी पुन्हा उद्भवली आहे. पालिकेने वेळेत किटकनाशकांची खरेदी न केल्याने आणि शहरातील डासांचा नायनाट करण्यासाठी किटकनाशकांची फवारणी न झाल्याने ही स्थिती ओढावली आहे. यामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात पोहोचला आहे. यावर्षीच्या सुरूवातीपासून शहरात डेंगी, मलेरियाचे रुग्ण कमी झाल्याचे दिसून येत होते. मात्र पावसाळयाअगोदर जलपर्णीमुळे आणि पावसाळयात पाणी साठून डासांची पैदास होण्यास सुरूवात होत असल्याने या काळात शहरात व्यापक प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात पालिकेच्या आरोग्य विभागाकडे किटकनाकशेच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. किटकनाशकांची फवारणीच न झाल्याने शहरात डासांचे प्रमाण झपाटयाने वाढले आणि त्यांनी पुणेकरांना आपल्या कचाटयात घेतले. डासांच्या चाव्यामुळे डेंगी आणि मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ झाली आहे.
डेंगीचे २० दिवसात आढळले ३४८ रुग्ण
By admin | Updated: July 21, 2014 03:50 IST