बारामती : चालत्या टेम्पोत अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा बारामतीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायाधीश आर. डी. सावंत यांनी ठोठावली. तर क्रीडा शिक्षकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. प्रशांत ऊर्फ चिंगू लहू वाबळे असे शिक्षा झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. इयत्ता ९ वीच्या वर्गात त्यावेळी शिक्षण घेत असलेली पीडित मुलगी इंदापूर क्रीडा संकुलात तालुकास्तरीय खो खोच्या स्पर्धेसाठी तिच्या वर्गातील मुलामुलींसह क्रीडा शिक्षकाबरोबर पिकअप टेम्पोमध्ये बसून आली होती. परंतु, मुलींची स्पर्धा झाली नाही. मुलांचा संघ खेळल्यानंतर सर्व मुले मुली आलेल्या टेम्पोतून परत जाण्यासाठी निघाले. क्रीडा शिक्षक टेम्पो ड्रायव्हर शेजारी बसले होते. तर आरोपी प्रशांत ऊर्फ चिंगू हा टेम्पोच्या मागील कॅरेजमध्ये पीडित मुलीच्या शेजारी बसला होता. टेम्पो इंदापूर क्रीडा संकुल येथून निघाला. काही अंतर पुढे गेल्यावर धावत्या टेम्पोत वाबळे याने पीडित मुलीचा विनयभंग केला. खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. संदीप ओहाळ यांनी काम पाहिले. खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यापैकी पीडित मुलीचे वडील, इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले होते. परंतु, पीडित मुलीची साक्ष ही विश्वासार्ह असल्याने ती ग्राह्य धरून आरोपीस शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. संदीप ओहोळ यांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने वरीलप्रमाणे प्रशांत ऊर्फ चिंगू वाबळे यास शिक्षा सुनावली.
विनयभंगप्रकरणी ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By admin | Updated: July 8, 2015 01:35 IST