दौंड : तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला २५0 कर्मचारी गैरहजर होते. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत. नोटिसांना मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित गैरहजर कर्मचाऱ्यांनी खुलासा दिला नाही तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिला आहे. निवडणूक प्रक्रिया ही गंभीर बाब आहे. मात्र, याचे गांभीर्य जे प्रशिक्षणाला गैरहजर होते त्यांना कळालेले दिसत नाही. तेव्हा लोकशाहीचा महत्त्वाचा घटक निवडणूक याचे गांभीर्य लक्षात यावे, या दृष्टिकोनातून प्रशिक्षणाला गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.तसेच निवडणूक होऊन निकाल लागेपर्यंत जो कर्मचारी अथवा अधिकारी निवडणुकीच्या कामकाजाबाबत टाळाटाळ करीत असेल, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. निवडणुकीतील उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दखल घेणे गरजेचे आहे. जो कोणी आचारसंहितेचा भंग करेल त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल. एकंदरीतच निवडणूक प्रक्रियेतील सर्व घटकांनी शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार उत्तम दिघे यांनी केले. (वार्ताहर)
गैरहजर २५0 कर्मचाऱ्यांवर फौजदारी
By admin | Updated: July 28, 2015 00:34 IST