पुणे : कोरोनाबाधितांची संख्या सातशेच्या आत आल्यामुळे शहरासाठी सोमवारचा दिवस दिलासादायक ठरला. परंतु, मंगळवारी कोरोनाबाधितांचा आकडा एक हजाराच्या पुढे गेला असला तरी, इतर दिवसांच्या तुलनेत ही वाढ तितकीशी नसल्याने कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. आज दिवसभरात नव्या १ हजार २१ रूग्णांची वाढ झाली असली तरी, २ हजार ८९२ रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.
सोमवारप्रमाणे मंगळवारीही दहा हजाराच्या आतच कोरोना तपासण्या झाल्या असून, आज दिवसभरात ९ हजार २५८ जणांनी तपासणी करून घेतली आहे. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ११.०२ टक्के इतकी आहे. दिवसभरात ६८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २२ जण पुण्याबाहेरील आहेत. आजचा मृत्यूदर हा १़ ६९ टक्के इतका आहे.
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचे घटणारे प्रमाण व मृत्यूची कायम राहिलेली संख्या यामुळे गेल्या काही दिवसांपासून मृत्यूदर हा ०.७ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ही १६ हजार ५२३ वर आली आहे.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार १० कोरोनाबाधित रुग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३६४ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २३ लाख ८१ हजार २९२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६१ हजार ८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ३६ हजार ६९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ७ हजार ७९५ जणांचा मृत्यू झाला आहे.
-----------