पुणे : शहरात अप्पर डेपो परिसरातील पवननगर, न्यू पद्मावती येथे गुंडाच्या टोळ्याने १६ वाहनांची तोडफोड करण्याची घटना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. आपल्या टोळीचे वर्चस्व दाखविण्याच्या प्रयत्नांतून गुंडांनी ही तोडफोड केल्याचे समोर आले आहे.अप्पर येथील दोन गटांमधील वादातून एका गटातील ७ ते ८ जणांचे टोळके मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पवननगर, न्यू पद्मावती या भागात आले. त्यांनी हातातील काठ्यांनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. टोळक्यांनी केलेल्या तोडफोडीत मारुती व्हॅन, छोटा टेम्पो, रिक्षा, कार, दुचाकी अशा सुमारे १६ गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.आपले वर्चस्व दाखविण्यासाठी दहशत निर्माण करण्यासाठी सध्या रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करण्याची नवी फॅशनच गुंडांमध्ये आली आहे. वारजे येथील रामनगर, स्वारगेट परिसरातील महर्षीनगर येथेही अशा प्रकारच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. प्रामुख्याने झोपडपट्टी भागात अशा घटना घडत असून त्यात आपली दादा प्रतिमा निर्माण करण्यासाठी गुंडांकडून असा हैदोस घालण्यात येतो. अनेकदा त्यातील आरोपी हे अल्पवयीन असल्याचे आढळून आले आहे.
पुण्यातील अप्पर डेपो परिसरात १६ वाहनांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 10:12 IST