दावडी : निमगाव खंडोबा (खेड) येथे माघ पौर्णिमेनिमित्त दीड लाख भाविकांनी सदानंदाचा येळकोट करीत भंडार-खोबऱ्याची उधळण करून खंडेरायाचे दर्शन घेतले. निमगाव खंडोबा कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे.जिल्ह्यातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून माघ पौर्णिमा ओळखली जाते. सकाळी देवाची पूजा झाली. संगमनेरकर व निगडेकर यांच्या मानाच्या काठ्यांची मिरवणूक निघून कळसाला काठ्या लावण्यात आल्या. पालखी प्रदक्षिणा झाली. बाळासाहेब शिंदे यांची मानाची शेवती वाजतगाजत निघाली. सकाळी दहा वाजता देवाचा लग्नसोहळा पार पडला. दिवसभरात दीड लाखाहून अधिक भाविकांनी भंडार-खोबऱ्याची उधळण करीत देवाचे दर्शन घेतले. रात्री एक वाजल्यापासून भाविकांचा दर्शनासाठी ओघ सुरू होता. नाशिक, नगर, पुणे, सातारा, मुंबई, ठाणे येथून मोठ्या संख्येने भाविक कुलधर्मकार्य व नवस फेडण्यासाठी आले होते.जय मल्हार यात्रा कमिटीने भाविकांसाठी दर्शनबारी, पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था केली होती. निमगाव येथे भाविकांना जाण्यासाठी एसटी महामंडळाने बस उपलब्ध केल्या होत्या. या यात्रेची व्यवस्था खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब शिंंदे, सचिव बाबासाहेब शिंदे, मोहन शिंंदे, मनोहर गोरगल्ले, दशरथराव शिंंदे, वसंत शिंंदे, रमेश येळवंडे, बबनराव शिंंदे यांनी पाहिली. तसेच प्रतिजेजुरी म्हणून ओळखला जाणाऱ्या खरपुडी येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती. (वार्ताहर)बैलगाडा घाटात मोठा बंदोबस्तबैलगाडा शर्यतीवर बंदी असल्यामुळे निमगाव घाटात नवसाचे बैलगाडे पळविण्यास पोलिसांनी मज्जाव केला. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांतून बैलगाडामालक नवसाचे गाडे पळविण्यासाठी आले होते. मात्र, पोलीस बैलगाडे पळविण्यास मज्जाव करीत होते. बैलगाडामालक पोलिसांशी हुज्जत घालत होते. बैलगाडा घाटात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
निमगाव खंडोबाच्या दर्शनासाठी दीड लाख भाविक
By admin | Updated: February 4, 2015 00:04 IST