पुणे : गेल्या दोन महिन्यात शहरात कचरा समस्या निर्माण झाली असतानाही; महापालिकेस सहकार्य न करता, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या तसेच प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणा-या तब्बल साडेचार हजार उपद्रवी नागरिकांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत जव़ळपास १२०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या असून तब्बल १० लाख २६ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील कचरा उरूळी देवाची येथील डेपोवर आणण्यास फुरसुंगी आणि उरूळी गावाच्या ग्रामस्थांनी घातलेली बंदी या आठवडयात मागे घेतली आहे. मात्र, त्या पूर्वी संपूर्ण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शहरात निर्माण होणारा कचरा महापालिकेकडून शहरातच जिरविण्यात येत होता. यावेळी नागरिकांना शिस्त लागावी तसेच कचरा समस्या गंभीर होण्यास कारणीभूत असलेल्या ५० मायक्रॉनहून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा, या उद्देशाने पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अस्वच्छता करणा-या तसेच बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या विक्रेत्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)प्रमुख क्षेत्रीय कार्यालयांना मिळेना वेळ शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या टिळक रस्ता आणि कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत मोठया प्रमाणात गेल्या दोन महिन्यात कचऱ्याची समस्या निर्माण झाली होती. तर कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात सर्वाधिक व्यावासायिक अस्थापना असल्याने प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर राजरोसपणे होतो. त्यामुळे या क्षेत्रीय कार्यालयांकडून ही कारवाई होणे अपेक्षीत असताना, महापालिकेने शहरात केलेल्या या दोन महिन्यांच्या कारवाईत या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांनी केलेल्या कारवाईचा कोणताही अहवाल घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे नाही. त्यामुळे या ज्या ठिकाणी गरज आहे. त्याच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचे काम योग्य पध्दतीने होत नसल्याचे चित्र आहे.. या कारवाई नंतर संबधितांकडून दंड वसूली करण्यात आली असून १३०० जणांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले.
१२०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
By admin | Updated: March 5, 2015 00:25 IST