लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन, महापालिकेने कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या अधिकाधिक व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून १६ ते २३ फेब्रुवारीदरम्यान १ हजार ४४० कोरोनाबाधित आढळून आले.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नव्याने आढळून आलेल्या प्रत्येक कोरोनाबाधिताच्या संपर्कातील किमान १५ जणांचा शोध घेऊन, त्यांना कोरोनाची लक्षणे आहेत का याचा तपास केला जात आहे. काही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कोरोनाबाधितांच्या संपर्कातील वीसपेक्षा अधिक जणांपर्यंत पोहोचून त्यांना काही लक्षणे आहेत का, याचाही तपास करण्यात आला आहे़
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये १६ ते २३ फेब्रुवारीपर्यंत आढळून आलेल्या ३ हजार ५११ कोरोनाबाधितांच्या संपर्कातील ५५ हजार ७० जणांची तपासणी (आरोग्यविषयक तक्रारीची माहिती) केली. यापैकी १२ हजार ४९२ जण हे ‘क्लोज कॉन्टॅक्ट’मधील (कुटुंबातील सदस्यांपैकी) होते. यापैकी लक्षणे असलेले २ हजार ४५७ जण तर लक्षणेविरहित १० हजार ३५ जण होते. तसेच ‘लो रिस्क’मधील (कमी संपर्कात असलेले) ४२ हजार ५८७ इतके नागरिक होते़ यापैकी २६८ जणांना लक्षणे आढळून आली तर ४२ हजार ३१० जण लक्षणेविरहित होते़
लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेले पण क्लोज कॉन्टॅक्टमधील व्यक्ती अशा ७ हजार ७६६ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले़ यात अॅण्टीजेनद्वारे झालेल्या २ हजार ७३१ चाचण्यांमध्ये ५३१ जण आणि आरटीपीसीआरद्वारे झालेल्या ५ हजार ३५ चाचण्यांमध्ये ९०९ जण असे मिळून १ हजार ४४० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत़
------------------------------------------------------