- विश्वास पाटीलहातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार व खासदार राजू शेट्टी यांची लोकसभेला विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी दमछाक होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी त्यांना आव्हान दिले आहे. ‘वंचित बहुजन आघाडी’ने अस्लम सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात दलित व मुस्लीम मतांचेही चांगले प्रमाण आहे. ही मते सय्यद यांनी घेतल्यास शेट्टी यांच्यापुढील अडचणी वाढतील. सुरवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत अंतिम टप्प्यात चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.शेट्टी यांची आतापर्यंतची ही पाचवी निवडणूक आहे. त्यांच्या मताधिक्याची कमान वाढती आहे. त्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ते किती मतांनी निवडून येणार, एवढीच उत्सुकता होती; परंतु आता ही निवडणूक नक्कीच एवढी सोपी राहिलेली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मोदी बेदखल करीत असल्याच्या रागातून भाजप आघाडीतून शेट्टी बाहेर पडले व तेव्हापासून ते मोदी यांच्यावर बोचरी टीका करीत आहेत. त्यामुळे भाजपने या मतदारसंघात सर्व पातळ्यांवर तयारी करून शेट्टी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. इचलकरंजी शहरात पाणीप्रश्नाचे भांडवल करून शेट्टी यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऊस आंदोलनात शेट्टी यांनी कारखानदारांशी उभा दावा मांडला; परंतु ‘आता काँग्रेसच्या आघाडीत जाऊन तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसला?’ असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
राजू शेट्टी विजयाची हॅट्ट्रिक करणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 04:10 IST