कोलकता : तृणमूल काँग्रेस समर्थकांच्या हल्ल्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या जखमी झालेल्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपने सोमवारी केला आहे. प. बंगालच्या २४ वा परगणा जिल्ह्यात निम्ता भागात तृणमूल कॉंग्रेस समर्थकांनी गेल्या महिन्यात केलेल्या हल्ल्यात त्या जखमी झाल्या होत्या.भाजप कार्यकर्त्यांनी निम्ता पोलीस ठाण्यासमोर या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने केली. तसेच एम. बी. रस्त्यावर टायर जाळले. भाजप कार्यकर्त्यांच्या आईचा मृत्यू तृणमूल कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात झालेला नसून, त्यांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाल्याचा दावा तृणमूल कॉंग्रेसतर्फे करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीटद्वारे या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.केंद्रीय मंत्री देबश्री चौधरी यांनी सांगितले, की २७ फेब्रुवारीला या ज्येष्ठ महिलेवर तिच्या निवासस्थानी तृणमूल कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर येथील रुग्णालयात २७ दिवस उपचार सुरू होते. हे आरोप फेटाळताना तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सौगता रॉय यांनी सांगितले, की या घटनेचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. भाजप विनाकारण या ज्येष्ठ महिलेच्या मृत्यूवरून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे. कोणताही मृत्यू दुर्दैवी आणि दु:खदायक असतो. मात्र, या महिलेवर जर कोणता हल्ला झाला असेल तर त्यात तृणमूल कॉंग्रेस समर्थक-कार्यकर्त्यांचा अजिबात हात नाही. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू वृद्धापकाळामुळे झालेल्या विकारांमुळे झालेला आहे.हिंसाचारमुक्त बंगालसाठी कटिबद्ध‘’तृणमूल पक्षाच्या गुंडांकडून झालेल्या निर्दयी मारहाणीत बंगालच्या कन्या शोवा मुजूमदार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अत्यंत अस्वस्थ आहे. त्यांच्या मृत्यूने मुजूमदार कुटुंबीयांना झालेल्या वेदना आणि त्यांचा तळतळाट ममता दीदींनाही भोगावा लागेल. हिंसाचारमुक्त भवितव्यासाठी, आपल्या माय-भगिनींसाठी सुरक्षित राज्य होण्यासाठी बंगाल कटिबद्ध आहे व त्यासाठी बंगाल संघर्ष करेल.” - अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
भाजप कार्यकर्त्याच्या आईच्या मृत्यूवरून आरोप-प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 05:25 IST