महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. मात्र, ज्या महिला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना दरमहा फक्त ५०० रुपये दिले जातील. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यात ज्यावेळी लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.
सरकार लाडक्या बहीण योजनेतून ८ लाख महिलांना अपात्र करणार आहे. ज्या महिला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत, त्याच महिला पुन्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचासुद्धा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले. अशा महिलांना पुढील महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतून फक्त ५०० रुपयेच मिळणार आहेत, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?लाडक्या बहिण योजनेंतर्गत महिलांना दरमहा दिले जाणाऱ्या १५०० रुपयांत घर चालते का? पण ज्या महिलांना कुटुंबात आधार नाही, अशा महिलांना सरकार १५०० रुपये देत होते, त्यांना फायदा झाला असता. आता लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी फक्त ५०० रुपयेच दिले जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयाची कीव करावीशी वाटते. हे फार दुर्दैवी आहे. सरकारने मतासाठी त्यावेळस सरसकट महिलांना लाभ दिला आणि मत घेतली. मात्र, आता ही योजना गुंडाळण्यासाठी आणि सरकारी तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लृप्त्या काढणे हे निंदनीय आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. ज्यावेळेस ही योजना लागू केली, त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारच्या बुद्धीला लकवा मारला होता का? असाही सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय.