- नारायण बडगुजरपिंपरी - घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून २१ वर्षीय तरुणाने पिंपरी - चिंचवड मधील संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून वरून उडी खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. सोमवारी (दि. २४ फेब्रुवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
सुजल संजय मनकर (२१, रा. राजगुरुनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल मनकर हा एका महाविद्यालयात बीसीएस मधील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. त्याने सोमवारी सायंकाळी संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावर प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला. तेथील एका डक्ट मधून थेट खाली रस्त्यावर उडी मारली. रस्त्यावर पडल्यावर त्याला एका वाहनाने चिरडले. स्थानकावरील नागरिकांनी ही घटना पाहताच आरडाओरडा केला. त्यानंतर त्याला तातडीने वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सुजल याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्याने घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले होते.