पिंपरी :वैष्णवी हगवणे आणि कस्पटे कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही. हुंडा प्रथा बंद झाली पाहिजे. त्यामुळे आपल्या संस्कृतीची वाईटाकडे वाटचाल होत आहे, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी वाकड येथे वैष्णवी हगवणे हिच्या आईवडिलांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ‘‘वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ही क्रूर घटना आहे. संशयितांनी रचलेला हा सामूहिक कट आहे. या प्रकरणात काय तपास सुरू आहे याबाबत कस्पटे कुटुंबियांना माहिती देण्यात यावी. ही हत्या आहे की आत्महत्या आहे याबाबत पोलिस तसेच सीआयडीकडून देखील तपास झाला पाहिजे. राज्यातील महिलांवर अत्याचार होत असून ते रोखण्यात गृह विभाग कमी पडतोय किंवा नाही हे या प्रकरणाच्या तपासावरून दिसून येईल. या खटल्यासाठी कस्पटे कुटुंबिय सांगतील तो वकील नियुक्त करण्यात यावा. कस्पटे कुटुंब सांगेल त्या-त्या वेळेस आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू.’’
‘‘महिला आयोगाने चांगले काम करावे’’
मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘‘कुठे जर कोणी आपले म्हणणे ऐकून घेणार नसेल तर महिला आयोगाकडे जाता येते. महिला आयोग सुधारला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिल्या पाहिजेत. सत्ता कोणाचीही आली आणि सत्ताधाऱ्यांकडून महिला आयोगावर त्यांच्याकडील व्यक्तीची नियुक्ती केली जाते. असे असले तरी महिला आयोगाने चांगले काम करणे आवश्यक आहे. ज्या महिलांची तक्रार येईल त्यांची तक्रार घेऊन महिला आयोगाने कठोर पाउले उचलली पाहिजेत.’’
माधुरी मिसाळ यांच्याकडून सांत्वन
महाराष्ट्राच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही सोमवारी वाकड येथे कस्पटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. वैष्णवीच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे, असे म्हणत मंत्री मिसाळ यांनी संवेदना व्यक्त केल्या.