पिंपरी - पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र शासनाने तत्त्वता मान्यता दिली आहे. त्यानंतरही राज्य शासनाकडून या निर्णयासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आम्हाला टोपी नको, निगडीपर्यंत मेट्रो हवी, अशी मागणी करीत सिटीझन फोरमच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल.पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी मार्गाचे काम महामेट्रोने सुरू केले आहे. मात्र, पहिल्याच टप्प्यात पिंपरी ते निगडी मेट्रो केल्यास साधारण ८०० ते ८५० कोटींचा खर्च येणार आहे. हा निधी देण्यास महापालिकेने तयारी दाखविली आहे.त्यानुसार आराखडा करण्याचे पत्र आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महामेट्रोला दिले आहे. शिवाय शहरातील खासदार व आमदार यांनीही केंद्र व राज्य शासनाकडे यासाठी पाठपुरावा केला आहे. मात्र, पालकमंत्री गिरीश बापट यांनी पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो शक्य नसल्याचे स्पष्ट केले. ही पिंपरी-चिंचवडकरांची फसवणूक असून, शहराला पुण्यातील मंत्र्यांकडून दुजाभावाची वागणूक दिलीजात आहे, असा आक्षेप सिटीझन फोरमचे तुषार शिंदे व सूर्यकांत मुथीयान यांनी घेतला.नागरिकांनी निगडीपर्यंतच्या मेट्रो मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी ८०३०६३६४४८ या नंबरवर मिसकॉल द्यायचा आहे. आतापर्यंत सहा हजार १२८ जणांनी मिसकॉल दिला आहे. त्यानंतरही शहरातील कारभारी जागे होत नसल्याने सिटीझन फोरमने आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेतला. त्यानुसार ११ फेब्रुवारीला पिंपरी चौकातील आंबेडकर पुतळ््यापुढे एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आम्हाला टोपी नको, निगडीपर्यंत मेट्रो हवी! सिटीझन फोरमची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 3:08 AM