पिंपरी - वल्लभनगर (पिंपरी) येथील एसटी आगाराच्या आवारात डुक्कर बॉम्बच्या स्फोटाने दोन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. दीड वर्षातील ही दुसरी घटना असून, रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. आगारातील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाला धावपळ करावी लागली. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला पाचारण करून बॉम्बसदृश वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. याच परिसरात असे प्रकार घडत असल्याने त्याचा नेमका शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.वल्लभनगर एसटी आगाराच्या मागील बाजूस तोंडाला गंभीर जखम होऊन मरून पडलेले कुत्रे दिसून आले. या प्रकरणी वल्लभनगर एसटी आगाराच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. आगार व्यवस्थापकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, तसेच संत तुकाराम पोलीस चौकीच्या अधिकाºयांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. डुक्कर बॉम्बचा स्फोट झाल्याची माहिती सर्वत्र पसरल्याने परिसरात घबराट पसरली. पोलिसांनीही बॉम्बशोधक व बॉम्बनाशक पथकाला बोलावून घेतले. त्यांच्या मदतीने तेथील बॉम्बसदृश वस्तू ताब्यात घेण्यात आली. दिघी मॅगझिन येथील संरक्षण खात्याच्या अधिकाºयांकडे तपासणीसाठी ही बॉम्बसदृश वस्तू पाठविण्यात येणार आहे, असे पोलीस अधिकाºयांनी सांगितले. डुक्कर बॉम्बमुळे कुत्र्यांचा मृत्यू होण्याची वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी अशाच प्रकारचे डुक्कर बॉम्ब येथे आढळून आले होते.असा असतो बॉम्बडुक्कर मारण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो. त्यामुळे या बॉम्बला डुक्कर बॉम्ब म्हटले जाते. या बॉम्बची आवाजाची तीव्रता कमी असते. जनावराने तोंडात पकडून चावण्याचा प्रयत्न केला असता, हा बॉम्ब फुटतो.
डुक्कर बॉम्बमुळे दोन कुत्र्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 02:47 IST