पिंपरी : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे राबविल्या जात असलेल्या अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तीन याद्या जाहीर होऊनही अद्याप ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. तसेच, तिसऱ्या फेरीतून नव्याने प्रवेश मिळालेल्या ४ हजार ८८१ आणि बेटरमेंटची संधी मिळालेल्या ७ हजार १२५ अशा एकूण १२ हजार ९६ विद्यार्थ्यांना ११ जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयामधील अकरावीच्या जागांसाठी राबविल्या जात असलेल्या आॅनलाइन प्रवेशाची तिसरी यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, की आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतून पहिल्या फेरीतून ३४ हजार ४७७, तर दुसऱ्या फेरीतून ६ हजार ९१० अशा एकूण ४१ हजार ३८७ विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने प्रवेश देण्यात आला. तिसऱ्या फेरीतून आणखी काही विद्यार्थी प्रवेश घेतील. त्याचप्रमाणे इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश दिलेले आहेत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीत कमी गुण मिळालेले असूनही जास्त कट आॅफ असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयात अर्ज केला, अशा ३ हजार ८८३ विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रक्रियेतून प्रवेश मिळालेला नाही, असे स्पष्ट करून रामचंद्र जाधव म्हणाले, या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश फेरी राबविली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांत रिक्त जागांवरील प्रवेशासाठी येत्या १६ व १७ जुलै या कालावधीत आॅनलाइन पसंतीक्रम पुन्हा एकदा भरता येतील. तसेच २२ जुलै रोजी गुणवत्ता यादी जाहीर करून २२ व २३ जुलैपर्यंत संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.(प्रतिनिधी)
तीन हजारांवर विद्यार्थी वंचित
By admin | Updated: July 11, 2015 04:46 IST