पिंपरी - पिंपरी कॅम्पातील २५ जणांनी एकत्र येत वैष्णोदेवी सेवा ग्रुप तयार केला आहे. या गु्रपच्या माध्यमातून पशू-पक्ष्यांना खाद्य आणि पाणी देण्यासाठी शहरात ठिकठिकाणी मातीची भांडी ठेवण्यात आली आहेत. यामध्ये दररोज खाद्यपदार्थ ठेवले जात असल्याने अनेक पशू-पक्ष्यांची तहान भूक भागत आहे.या ग्रुपमधील सर्वजण नोकरीसह विविध उद्योग, व्यवसायात आहेत. आपला व्यवसाय सांभाळून या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवितात. सध्या अनेकांकडे एकमेकांना भेटण्यास, बोलण्यासही वेळ नाही, अशा परिस्थितीत हे तरुण या विधायक उपक्रमासाठी दररोज दोन तास देत आहेत. सकाळी घरातून निघाल्यानंतर पिंपरीतील इंदिरा गांधी रेल्वे पूल, कराची चौक, वैभवनगर, रेल्वेस्थानकाकडे जाणारा मार्ग आदी ठिकाणी धान्याचे दाणे, बिस्किटे, फरसाण ठेवण्यासह पक्ष्यांना पिण्यासाठी पाणीही ठेवले जाते. यासाठी कामाची जबाबदारीही वाटून देण्यात आली आहे. या उपक्रमासाठी गु्रुपचे सदस्य ठरावीक वर्गणी काढतात. या जमा झालेल्या वर्गणीतूनच या उपक्रमासाठी खर्च केला जातो. नोकरी, धंदा सांभाळून हा उपक्रम राबवीत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून प्राणी-पक्ष्यांना अन्नपाणी मिळत असल्याने समाधान वाटते, अशी भावना गु्रपचे सदस्य व्यक्त करतात. यासह पिंपरीगावातील मंदिरांसह इतर मंदिरांत, तसेच पालखी सोहळ्यातील भाविकांना आणि गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीतील कार्यकर्त्यांना अन्नदान, पाणीवाटप आदी उपक्रम राबवीत असतात. दिवसेंदिवस गु्रपच्या कामाचा विस्तार वाढत आहे.ठरावीक वेळी घिरट्याअनेक प्राणी, पक्षी अन्न-पाण्याच्या शोधात भटकत असतात. अशा पक्ष्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून अन्न-पाणी उपलब्ध होत आहे. रोज ठरावीक ठिकाणी ठेवल्या जाणाऱ्या या खाद्यामुळे पक्षीदेखील ठरावीक वेळी त्या ठिकाणी घिरट्या घालत असतात.सदस्यांचा उत्स्फूर्तपणासकाळी लवकर उठून निश्चित ठिकाणी खाद्यपदार्थ ठेवण्याची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. साडेसात ते साडेनऊ या वेळेत सर्व ठिकाणी खाद्यपदार्थ ठेवले जाते. हे काम गु्रपचे सर्व सदस्य उत्स्फूर्तपणे करीत असतात.
युवक भागविताहेत पक्ष्यांची तहानभूक, शहरात ठिकठिकाणी व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 02:42 IST