वाकड : हिंजवडी ग्रामपंचायतीमधील अपात्र सदस्यांनी निकाल लागेपर्यंत हिंजवडी ग्रामपंचायतीच्या कारभारात, सभेत व मतदानात सहभाग घेऊ नये, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी हिंजवडी ग्रामपंयतींच्या आठ सदस्यांना अपात्र ठरविले होते. त्याच्या विरोधात या सर्वांनी विभागीय अप्पर आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. मात्र अतिक्रमणांच्या स्थितीबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मावळचे प्रांत यांच्याकडून अहवाल येईपर्यंत अप्पर विभागीय आयुक्तांनी सुनावणी पुढे ढकलल्याने स्थगितीला अपात्र ठरलेले ग्रामपंचायत सदस्य सुखावले होते. विरोधकांनी या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत रिट पिटीशन दाखल करीत आपली बाजू मांडल्याने अखेर न्यायाधीश एम. एस सोनक यांनी या प्रकरणात अपात्र ठरविलेल्या सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात, सभेत व मतदानात कोणत्याही प्रकारचा हक्क बजवायचा नाही व प्रशासनात हस्तक्षेप करायचा नाही. स्थगितीबाबत जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत त्यांना कसलाही अधिकार नाही असा आदेश त्यांनी दिला आहे.अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी २ जानेवारीला हिंजवडीच्या सरपंच रोहिणी दत्तात्रय साखरे, प्रवीण दत्तात्रय जांभूळकर, सदस्य सागर दत्तात्रय साखरे, राहुल अरुण जांभूळकर, श्रीकांत दिलीप जाधव, जयमाला संभाजी हुलावळे, बेबी दिलीप हुलावळे,व रेखा संदीप साखरे यांनी अपात्र ठरविले होते, तर निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या तक्रारी अर्जातील नवव्या सदस्या स्मिता संजय जांभूळकर यांना देखील अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अपात्र ठरविले आहे. (वार्ताहर)
‘त्या’ सदस्यांनी कारभारात हस्तक्षेप करू नये
By admin | Updated: February 29, 2016 00:51 IST