पिंपरी :महाराष्ट्र संघातून खेळताना माझी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. अंतिम सामन्यातील संयमी खेळ हा निर्णायक ठरला आणि भारतीय संघाने विश्वचषकावर विजयाची मोहोर उमटवली, हा आनंद व्यक्त करणे कठीण आहे. त्या क्षणांनी अजूनही मी भारावलेली आहे, अशी भावना भारतीय महिलांच्या १९ वर्षांखालील संघात खेळणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या ईश्वरी अवसरे व्यक्त केली.
भारतीय महिलांच्या १९ वर्षांखालील संघाने सलग दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेचा ९ बळींनी पराभव केला. आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी ८३ धावांचे लक्ष दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान १ बळी गमावून ११.२ षटकांमध्ये पूर्ण केले. या संघात पिंपरी-चिंचवड मधील ईश्वरी अवसरे हिचाही समावेश होता.
लहानपणापासून ईश्वरीला क्रिकेट खेळात रस होता. त्यामुळे वयाच्या आठव्या वर्षापासून तिला प्रशिक्षक सुनील दिवेकर यांच्या क्रिकेट अकादमीला प्रवेश घेतला. सध्या तिचे कोल्हापूर येथे शालेय शिक्षण सुरू आहे. आई खासगी शाळेत शिक्षिका, तर वडील लष्करात आहेत. लेगस्पिनर, सलामीवीर फलंदाज आणि पार्ट-टाईम विकेटकिपर म्हणून ती एकहाती सामन्यात किल्ला लढविते. दहा वर्षांची असताना तिला सचिन तेंडुलकर यांचे मार्गदर्शनही मिळाले. तसेच तिला सरदार पाटील, वर्षाराणी पाटील, विनायक पवार यांचे मार्गदर्शन लाभले. ..अशी आहे ईश्वरीची कामगिरीईश्वरी १३ वर्षांची असताना तिची १५ वर्षांखालील महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली. भारतात फलंदाजीत नवव्या क्रमांकावर राहिली. १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत राज्याकडून खेळताना एकदिवसीय मालिकेत दोन शतकांसह ४८१ धावा केल्या. २०२३-२४ मध्ये टी-२० मध्ये महाराष्ट्राकडून ४ अर्धशतकांसह ३२५ धावा केल्या. या कामगिरीची दखल घेत तिला रोटरी क्लब ऑफ पुणेने प्रोफेसर देवधर पुरस्काराने सन्मानित केले. २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात १९ वर्षांखालील महिला क्रिकेटमध्ये तिची कर्णधारपदी निवड झाली. २०१ सामन्यांत ११ शतकांसह ६,६०३ धावा...भारतीय संघात सर्वात कमी वयाची खेळाडू म्हणून तिची नोंद झाली. वयाच्या १४ व्या वर्षी राज्य संघात १५, १९ आणि २३ वर्षांखालील व खुल्या श्रेणीतील संघात बीसीसीआयने आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेणारी ती एकमेव आहे. देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट सामन्यात २८४ धावांसह सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही तिच्या नावावर आहे. १९ वर्षांखालील चॅलेंजर ट्रॉफीसाठी संघात निवड झाली होती, तर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतही निवड झाली होती. वरिष्ठ महिला एकदिवसीय आमंत्रित स्पर्धेत २७० धावांचा विक्रमही तिच्या नावावर आहे. महाराष्ट्राकडून खेळताना तिने टी-२० सामन्यांत ७५ चेंडूंत १०५ धावांचा विक्रमही तिच्या नावावर आहे. आतापर्यंत तिने २०१ सामन्यांत ६,६०३ धावा केल्या. त्यात ११ शतकांचा समावेश आहे.