पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने ठेकेदाराला सुमारे दहा कोटींची जादा रक्कम देण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा, तसेच निविदा प्रक्रियांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डांगे चौक ते वाकड अंडरपासपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम ठेकेदार १७ कोटींमध्ये करण्यास तयार असताना यासाठी स्थायी समितीने मात्र ठेकेदाराला वाढीव सहा कोटी सोळा लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यासह चापेकर चौक ते थेरगाव पूल यादरम्यानचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यासाठी ठेकेदार साडेनऊ कोटी रुपयांत तयार असताना स्थायी समितीने ठेकेदाराला १३ कोटी ७ लाख रुपये देण्यास मंजुरी दिली. यामुळे महापालिकेला सुमारे दहा कोटींचे नुकसान होणार आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून, संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करावी. अधिकारी आणि स्थायी समिती सदस्य यांच्यावर कारवाई करून फेरनिविदा काढण्याची मागणी चाबुकस्वार यांनी केली आहे.स्थायी समितीने ठेकेदारालासहा कोटींची जादा रक्कम देण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.(प्रतिनिधी)
निविदा प्रक्रियांची होणार चौकशी
By admin | Updated: October 31, 2015 01:01 IST