वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील तलाठी गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असून कागदपत्रांसाठी शेतकºयांना पैसे खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी तलाठी शोधण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक दिवसांपासून सातबारा आॅनलाइन करण्याचे काम सुरू असल्यामुळे तलाठी आपल्या कार्यालयात फिरकतच नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, शेतकरी तलाठी शोधण्यासाठी कधी तालुक्याच्या ठिकाणी तर कधी गावातील तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.गेल्या दीड-दोन वर्षांपासून सातबारा हा आॅनलाइन करण्याचे काम सुरू असल्यामुळे तलाठी कार्यालयात बसतच नाहीत. कधी बावधन, कधी तळेगाव, कधी वडगाव, तर कधी इतर ठिकाणी ते भूमिगत झाल्यासारखे वावरत आहेत. नागरिक-तलाठी संपर्क तुटला आहे. आॅनलाइनचे काम पूर्ण होत नसल्याने किंवा त्यांत विलंब होत असल्याने तलाठी फोनदेखील बंद ठेवत आहेत. अनेक कारणे सांगून तलाठी शेतकºयांना भेटणे टाळतात.पूर्वी आॅनलाइनचे काम चालू असताना तलाठ्यांना बावधन येथील कार्यालयात बसण्याची मुभा होती. काही दिवसांनी नवीन तहसीलदार आल्यावर त्यांनी तळेगाव येथील एका महाविद्यालयात तलाठ्यांना एकत्र बसण्याची, काम करण्याची व्यवस्था केली. नागरिक तेथे तलाठ्यांना येऊन भेटू लागले. परंतु कोणतीही कल्पना न देता अचानक कार्यालय स्थलांतरित करण्यात आले. नागरिक पुन्हा काही दिवस तलाठ्याच्या शोधात तळेगाव व वडगाव येथे भटकू लागले. पुन्हा तहसीलदारांनी तळेगावातील लिंब फाटा येथील इमारतीत तालुक्यातील तलाठ्यांच्या आॅनलाइन कामासाठी कार्यालय केले. आता नागरिक या ठिकाणी येऊन तलाठ्याची वाट पाहत थांबत आहेत. परंतु तेथेही तलाठी वेळेवर भेटत नाहीत.सात-बारा वा त्यावर तलाठ्याची सही घेण्यासाठी नागरिकांना दिवसाला पाचशे-सहाशे रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणांवरून नागरिकांना वडगावला येण्यासाठी वाहनाचीही व्यवस्था नसल्याने एक सात-बारा घेण्यासाठी नागरिकांचा पूर्ण एक दिवस वाया जात आहे. याला तहसील कार्यालय जबाबदार असल्याचे नागरिकांचे मत आहे.तलाठी भाऊसाहेबाच्या शोधात आलेल्याांना तहसील कचेरीत अधिकारी बेजबाबदारपणाने उत्तर देतात. तलाठी किंवा मंडल अधिकाºयाने आपली आठवडाभराची माहिती आपल्या कार्यालयाच्या बाहेर लिहिणे अनिवार्य आहे. तरीही अशी सूचना ते लिहीत नाहीत. तलाठी आॅनलाइनसाठी सर्व्हर असणाºया ठिकाणी जाऊन बसू शकतात. म्हणून त्यांचे कार्यालय बंद असते. मंडल अधिकारी कार्यालयही दिवसेंदिवस बंद असते. विविध दाखले मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तलाठी कार्यालयात अनेक ठिकाणी वीज, पाणी, शौचालयाची सोय नाही. तालुक्यात १०९ गावे असून, ३३ तलाठी, तर सात मंडल अधिकारी आहेत. अपुºया संख्येमुळे तलाठ्यांवर कामाचा ताण पडत आहे.बायोमेट्रिक : सुविधेची मागणीतत्कालीन तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांनी कार्यालयातील सर्व खासगी कारकुनांना येण्यास मज्जाव घातला होता. तेव्हा तलाठी नागरिकांना वेळेवर भेटत होते. तलाठी वेळेवर ी कामे करीत होते. परंतु आता कार्यालयीन अधिकाºयांचे तलाठी, मंडळाधिकारी यांच्यावर नियंत्रण नसल्याने कामे वेळेवर होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अधिकाºयांची येण्याची आणि जाण्याची वेळ ठरलेली नाही. ते कधी येतात आणि कधी जातात, हे नागरिकांना समजत नसल्याने कार्यालयात बायोमेट्रिक मशिन लावून घेण्याची मागणी आहे.सोमवारी, शुक्रवारी तलाठी उपलब्धगेल्या अनेक दिवसांपासून आॅनलाइनचे काम सुरू असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तलाठ्यांना आठवड्यातील सोमवार आणि शुक्रवार या दोन दिवशी आपल्या कार्यालयात बसण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दिवशी नागरिकांनी जाऊन आपली कागदपत्रे तलाठी कार्यालयातून मिळवावी. - सुभाष भागडे,प्रांताधिकारी, मावळसात-बारा उतारा आॅनलाइन करण्याचे काम अजून दीड ते दोन महिने सुरू राहणार आहे. परंतु नागरिकांसाठी आठवड्यातून एक ते दोन दिवस तलाठी आपल्या कार्यालयात बसतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. - रणजित देसाई,तहसीलदार, मावळ
मावळ तालुक्यात आॅनलाइनमुळे तलाठी ‘नॉट रिचेबल’, कागदपत्रांसाठी नागरिकांना हेलपाटे; तहसील कार्यालयात मिळतात बेजबाबदार उत्तरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 02:34 IST