मोशी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचे पर्व पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रभाग ३ मोशी-चऱ्होलीतील मतदार राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मागे ठामपणे उभे राहतील, असा विश्वास माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक तीन चऱ्होली, मोशीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विनयाताई तापकीर, संजय पठारे, घनश्याम खेडकर, मंदाताई आल्हाट यांच्या परिसरात मतदारांशी संपर्क साधला. या वेळी आयोजित कोपरा सभेत विलास लांडे बोलत होते. या वेळी बाजीराव पठारे, कैलास पठारे, मोहन पठारे, राजा पठारे, रघुनाथ पठारे, महिपत पठारे, विठ्ठल पठारे, उत्तम देवकर, मिथुन पठारे, संदीप पठारे, राजू भोसले, चंद्रकांत पठारे, दिगंबर खेडकर, विश्वास पठारे, संतोष हजारे, सुदाम काशीद, संतोष बुर्डे, संतोष काटे आदी उपस्थित होते. लांडे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटीत पात्रता असतानाही सापत्न वागणूक देऊन जनतेच्या विश्वासाला तडा दिला आहे. पवना, इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पामध्ये देखील डावलण्यात आले आहे. भाजपाच्या वल्गनांवर आता जनता विश्वास ठेवणार नाही. केंद्रात व राज्यात त्यांनी जनतेचा भ्रमनिरास व विश्वासघात केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच प्रभाग ३ मधील सर्व मतदार त्यांचा राग मतपेटीतून व्यक्त करतील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला पसंती देतील.’’राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी पठारेमळा, काळजेवाडी, ताजणेमळा, भोसलेवस्ती परिसरात शेतमजूर कामगार बांधवांची भेट घेऊन मतदानाचे आवाहन केले.(वार्ताहर)
विकासकामासाठी राष्ट्रवादीला साथ द्या
By admin | Updated: February 15, 2017 02:12 IST