पिंपरी : सांगवी, काळेवाडी, रहाटणी, चिखली आदी परिसरात ठिकठिकाणी धनत्रयोदशीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शहरातील विविध बाजारपेठेतील सराफी पेढीत खरेदीसाठी ग्राहकांनी सोमवारी गर्दी केली होती. सर्वगुणसंपन्न वैभवलक्ष्मी घरात यावी, यासाठी घराघरातील महिलांनी सायंकाळी दागिने-धन याची पूजा केली. तसेच घराच्या उंबरठ्यावर पणती लावून कुटुंबातील सदस्यांना आरोग्यसंपदा लाभावी म्हणून महिलांनी परिवारासह पूजा केली. महिलांनी घरातील सर्व दागिने एका पाटावर ठेवून हळदी-कुं कू वाहून दागिन्यांची आणि घरातील पैशांची पूजा केली. प्रत्येक व्यक्तीला सुदृढ आरोग्य मिळावे, या हेतूने महिलांनी मनोभावे पूजा केली. घरात लक्ष्मीचा वास राहावा, याकरिता चांदीचा शिक्का खरेदी करतात किंवा एखादे भांडे या वेळी खरेदी करतात. तसेच या दिवशी महिलांनी गव्हाच्या कणिकाच्या पणत्या बनवल्या. दक्षिण दिशेच्या बाजूने दिव्याचे टोक करून परिवारासह यमदीपाची (पणतीची) पूजा केली. धन्वंतरीची पूजा करण्यासाठी हा दिवा लावला जातो. दिवाळीसाठी घराची साफसफाई केली असतानादेखील या दिवशी विशेष स्वच्छता करण्यात आली. सकाळपासूनच घराची साफसफाई करण्यात महिलावर्ग व्यस्त होता. सायंकाळच्या वेळी लक्ष्मीच्या आगमनासाठी महिलांनी दारात रांगोळी काढल्या. यानिमित्त दारात लक्ष्मीच्या पावलांचे ठसे रांगोळीद्वारे उमटविण्यात आले. शहरात अन्यत्रही धनत्रयोदशी साजरी झाली. पिंपरी, कासारवाडी, डांगे चौक, चिंचवड, वाकड या ठिकाणीही महिलांनी धनत्रयोदशी साजरी केली.(प्रतिनिधी)
धनत्रयोदशीची खरेदी उत्साहात
By admin | Updated: November 10, 2015 01:48 IST