खडकी : मागील अनेक वर्षांची परंपरा खडकीतील सार्वजनिक गणपती मंडळांनी यंदाही कायम ठेवली आहे़ यंदाही खडकीत मोठ्या प्रमाणात देखावे सादर करण्यात आले आहे़ विशेष म्हणजे खडकीत कुठेही यंदा डीजे डॉल्बी सिस्टिम लावण्यात आलेला नाही़ दरवर्षी नाट्यरूपाने देखावे सादर करण्यात येणाºया मंडळांची संख्या यंदा कमी झाली असून हलत्या देखाव्यांवर भर देण्यात आला आहे़ खडकीतील देखावे आवर्जून पाहावे, असे आहेत.नॅशनल यंग क्लब मित्र मंडळाने समाजप्रबोधनपर जिवंत नाट्यरूपाने देखावा सादर केला असून शेजारीच असलेल्या विकास तरुण मंडळानेही नाट्यरूपात देखावा सादर केला आहे़ मधला बाजार मित्र मंडळाने शंभर पाट्यावर सुविचार लिहून रोजच्या जीवनात घडणाºया गोष्टींवर प्रकाश टाकला आहे़ तर नवी तालीम नूतन तरुण मंडळाने काल्पनिक मंदिराची प्रतिकृती साकारली आहे़ गवळीवाडा मित्र मंडळाने जिवंत नाट्यरूपाने देखावा सादर केला असून समाजप्रबोधन केले आहे़ डेपोलाईन मित्र मंडळाने रावणाचे गर्वहरण हा भला मोठा देखावा सादर करून पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्यासाठी परिसरात फलक लावले आहेत़ मंडळाचे यंदा ९५ वे वर्ष असून दरवर्षी मोठे देखावे सादर करण्याचा मान मंडळाला मिळाला आहे़ वर्षभर सामाजिक शैक्षणिक कार्य मंडळातर्फे करण्यात येते़ कीर्तन सप्ताह आदी कार्यक्रम मंडळ सातत्याने करत आले आहे़ येथील देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे़ गाडीअड्डा येथील न्यू दत्त तरुण मंडळ यंदा ७५ व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने मंडळाने अतिशय आकर्षक महाल तयार केला असून महालावरती छत्रपती शिवरायांनी प्रतिकृती उभारली असून, महालाच्या समोर पाण्याचा सुंदर झरा तयार केला आहे़ तसेच गाडीअड्डा मैदानावर फन फेयर मेळा भरवला आहे.महात्मा गांधी चौकातील नवा बाजार मित्र मंडळाने यंदा गंगा अवतरण हा हलता देखावा सादर केला आहे़ शंकराची भव्यदिव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधत आहे़ मंडळाचे अध्यक्ष सतीश अगरवाल यांनी त्यांच्या संकल्पनेतून देखावा सादर केला आहे़ व्यापारी मित्र मंडळाची लालबाग चा राजा मूर्ती खडकीतील सर्वात उंच मूर्ती आहे़
खडकीत पौराणिक देखावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:00 IST