थेरगाव: गुजरनगर येथील एबीसी निर्माण बिल्डिंग समोर गेल्या आठ दिवसांपूर्वी पाण्याची पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेला रस्ता खडी मुरूम टाकून तात्पुरता बुजवला आहे. या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, किरकोळ अपघात होऊ लागले आहेत.जोरदार पावसाने जमिनीच्या खाली असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधून पाणीगळती होऊन रस्त्यावर पाणी येत होते. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाकडून रस्ता खोदण्यात आला होता. ही दुरुस्ती झाल्यानंतर रस्ता व्यवस्थित बुजवून डागडुजी करणे गरजेचे असतानाही मुरूम आणि खडी टाकून तात्पुरती दुरूस्ती करण्यात आली. एका बाजूने बॅरिकेड लावण्यात आले. यामुळे रस्ता अर्धा बंद झाल्याने वाहतूककोंडीत भर पडू लागली आहे. याचा त्रास सामान्य नागरिकांना आणि येथील व्यावसायिकांना नाहक सहन करावा लागत आहे़ गेल्या दोन महिन्यांपूर्वी पवार नगर, महादेव कॉलनी, लक्ष्मणनगर, १६ नंबर, पडवळनगर, भोंडवेनगर यासह अनेक ठिकाणी अंतर्गत भागात पाईपलाईन बदलण्याचे काम झाले आहे. त्यामुळे रस्ते खोदण्यात आले होते. वेळीच या रस्त्यांची डागडुजी केलेली नसल्याने ऐन पावसाळ्यात या रस्त्यांची अवस्था आणखी दयनीय झालेली आहे. या रस्त्यावर मुरूम व चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. वाहनचालकांसह पादचाऱ्यांना या ठिकाणी चांगलीच कसरत करून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी प्रवास करणे अवघड झाले आहे. या गोष्टीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यात रस्ता खोदू नका असे सांगण्यात येत असल्याने रस्ते उखडून खडी रस्त्यावर पसरण्याचा प्रकार घडला आहे. ..........१- पिंपळे गुरव : नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. जुन्या भुयारी गटारांची पाईप काढून नवीन पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत परिसरात सिमेंट रस्ते बनविण्यात येत आहेत. बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र रामकृष्ण मंगल कार्यालय चौक ते गावठाण, पिंपळे गुरव स्मशानभूमीजवळ पाईप टाकण्याचे काम सुरु आहे...........२- या कामामुळे नागरिक व वाहनचालकांना एकेरी मार्गावरुन ये-जा करावी लागते. शाळकरी मुलांना तारेवरची कसरत करावी लागते. लक्ष्मीनगर गल्ली क्रमांक २ मध्ये पाईप टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे. रस्ते चिखलमय बनले आहेत. या कामामुळे व खड्डयांमुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. दापोडीत शितळादेवी चौक, आंबेडकर चौक, शिवाजी चौक, जुनी सांगवी ते सांगवी फाटा या रस्त्यावर खड्डे तर बहुतांश ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रस्त्यावर पाण्याची डबकी साचली आहेत. ......३ - स्वामी विवेकानंद विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना रस्त्यावर चालणे जिकरीचे बनले आहे. रस्त्यावर चेंबर दुरुस्तीमुळे सभोवताली खड्डे पडले आहेत. पाणी साचलेल्या ठिकाणी आंदाज न आल्यामुळे सायकल व दुचाकी खड्ड्यांत आदळतात. अचानक ब्रेक लावल्यामुळे एकमेकांवर आदळण्याचे प्रकार वाढले आहेत.