लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या विविध भागातील दहा ठिकाणी सुमारे दहा हजार सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ८८५ कोटी १२ लाख रुपये खर्च येणार आहे. गृहयोजनेच्या ठिकाणी विविध मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी ५० कोटी १५ लाख रुपये खर्च होणार आहे. या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नागरिकांकडून अर्ज मागविले आहेत. शहराच्या विविध भागात दहा ठिकाणी नऊ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन आहे. त्यानुसार चऱ्होली येथे १४४२, रावेतमध्ये १०८०, डुडुळगावमध्ये ९८६, दिघीत ८४०, मोशी - बोऱ्हाडेवाडीमध्ये चौदाशे, वडमुखवाडीत चौदाशे, चिखलीमध्ये चौदाशे, पिंपरीत तीनशे, पिंपरीतच आणखी दोनशे आणि आकुर्डीमध्ये पाचशे सदनिका उभारण्याचे प्रस्तावित आहे.चौदा मजली उंच इमारती उभारण्याचे प्रस्तावित असून, तळमजला वाहनतळासाठी राखीव असेल. प्रत्येक मजल्यावर सोळा सदनिका आणि दोन लिफ्ट असतील. अग्निशामक व्यवस्था, पाण्याच्या टाक्या, प्रत्येक सोलर हिटर सुविधा, सोसायटी कार्यालय, देखभाल-दुरुस्ती, लिफ्टची आणि मैलाशुद्धीकरण केंद्राची देखभाल-दुरुस्ती करावी लागणार आहे.
‘पंतप्रधान आवास’ला मान्यता
By admin | Updated: June 21, 2017 06:26 IST