देहूगाव : गेल्या चार दिवसांचा अनुभव पाहता रविवारच्या सुटीचा फायदा घेत परिसरातील कामगार व सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या हजार, पाचशेच्या नोटा बदलून घेण्यासाठी येथील बँकांसह पोस्ट आॅफिसमध्येही पहाटे सहा वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या.नागरिकांनी रांगा सुरक्षितपणे रस्त्यावर लावल्या होत्या. मात्र, आपल्या दुचाकी रस्त्याच्या कडेलाच लावल्याने वाहतूककोंडीही मोठ्या प्रमाणात होताना दिसत होती. अशाही परिस्थितीत नागरिक संयमाने रांगेत उभे होते. कुटुंबातील माणसे आलटून-पालटून रांगेत उभी राहिलेली दिसून येत होती. काही व्यावसायिक मात्र बँकेत रोजच चेक लागले आहेत. सांगत घुटमळताना दिसत होते. त्याबाबत उलटसुलट चर्चा, अंदाज बांधले जात होते.देहूगाव परिसरातील सर्वांत जास्त खातेदार असलेली बँक आॅफ महाराष्ट्र ही आहे. त्याखालोखाल पीडीसीसी व कॉर्पोरेशन बँकेचे खातेदार आहेत. देहूगाव या विकसित परिसरात चाकण- तळेगावसह पिंपरी-चिंचवड परिसरातील औद्यागिक पट्ट्यातील कामगार व शेतकरी असा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.चार दिवसांपासून बँकांमध्ये हजार, पाचशेच्या नोटांचा भरणा, बदलून देण्याचे काम सुरू आहे. मात्र, कामगारांना कामातून वेळ काढून घेऊन चलन बदलून घेणे शक्य नव्हते. परिणामी, त्यांच्या जवळ कुटुंबातील किमान गरजा भागविण्यासाठी व दैनंदिन व्यवहारासाठीची रक्कमही खिशात नसल्याने आणि रविवारी सुटी असल्याने कामगार, लोकांनी पहाटेपासून बँकेच्या बाहेर रांग लावली होती. येथील बँक आॅफ महाराष्ट्रबाहेर सकाळी बँक उघडण्यापूर्वीच सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूच्या रस्त्याने ही रांग गोवंडे हॉस्पिटलपर्यंत गेली होती. एवढी गर्दी पहिल्यांदाच झाली होती. बँकेने उपलब्ध रोख रक्कम वाटपाला सुरुवात केली व जमा करून घेण्यासही सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, दुपारी जवळपास बारा लाख रुपये शंभर, पन्नास व दोन हजार रुपयांच्या नोटा मिळाल्या असल्याने नोटा बदलून देण्यास अडचण येत नव्हती. हीच परिस्थिती कॉर्पोरेशन बँकेतही होती. सुटी असल्याने येथे नोटा बदली करून घेण्यासाठी गर्दी होती, मात्र, बँकेच्या बाहेर उभे राहण्यास पुरेशी जागा नसल्याने गैरसोय झाली.(वार्ताहर)
देहूगावात पहाटेपासून रांग
By admin | Updated: November 14, 2016 02:48 IST