पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) भोसरी डेपोतील मोकळ्या जागेत पावसाचे पाणी साचून डासोत्पत्ती स्थाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे महापालिका आरोग्य विभागाने पीएमपीएमएल व्यवस्थापकांना नोटीस दिली आहे. डेपोतील डासोत्पत्ती स्थाने सात दिवसांत नष्ट करुन त्याचा अहवाल सादर करावा. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य विभागाने दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाचे पाणी साचल्याने डासोत्पत्ती स्थानांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरिया व चिकनगुणिया सदृश आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी भोसरीतील पीएमपीएल डेपोला भेट दिली. डेपोत २० ते २५ बसेस बंद अवस्थेत पडून आहेत. त्या निर्लेखित करण्यात आल्या आहेत. तसेच डेपोतील मोकळ्या जागेत पावसाचे पाणी साचून डासोत्पत्ती स्थाने निर्माण झाल्याचे निर्दशनास आले.
डेपोतील अस्वच्छतेमुळे, साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना धोका संभवतो. सार्वजनिक आरोग्याच्या हितास निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता डेपोमध्ये स्वच्छता ठेवणे, तातडीने डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे आवश्यक आहे. डेपोत पडून असलेल्या बसेसची तातडीने विल्हेवाट लावावी. डेपोमध्ये तातडीने औषध फवारणी करावी. सात दिवसांत डासोत्पत्ती स्थाने नष्ट करुन त्याबाबतचा अहवाल महापालिकेला सादर करावा. असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.