अंकुश जगताप, पिंपरीग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात तू का मी यासाठी गुरुवारी अनेक गावांत चिठ्ठी टाकून, तर अनेकांनी चक्क छापा-काटा करून सत्तेच्या सारीपाटाचा फैसला करण्याचे प्रकार झाले. उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाले आहे. त्यामुळे सध्या पावसाचा जोर कमी झाला असला, तरीही उमेदवारांच्या प्रचाराचा पाऊस कोसळू लागला आहे. आपल्याकडे मते वळविण्यासाठी कूटनीतीचा फास टाकण्याचा प्रकार सुरू आहे. २३ जुलैला अर्जमाघारी आणि चिन्हवाटप झाले. त्या वेळी आपली मते घेऊन नुकसानीचे ठरू शकतात, अशा उमेदवारांना माघार घेण्यासाठी मुरलेल्या पुढाऱ्यांनी नानाविध प्रकारांचा वापर केला. कोणी दबावतंत्राचा, तर कोणी तडजोडीचे राजकारण करून कल आपल्या बाजूने वळविला. काही गावांमध्ये पॅनलमध्ये उमेदवारी कोणाला मिळावी यासाठी दोघांमध्ये तडजोडच होत नव्हती. अशा वेळी मार्ग काढण्यासाठी छापा-काटा करण्याची नवीनच पद्धत राजकारणात वापरली गेल्याचे पाहण्यास मिळाले. ज्याच्या बाजूने निर्णय लागेल, त्याने उमेदवारीअर्ज भरण्याचे निश्चित केले आहे. गुरुवारी निवडणूक चिन्हांचे वाटप झाले. त्या वेळी अपेक्षेप्रमाणे चिन्ह मिळावे यासाठी उमेदवारांची दिवसभर घालमेल सुरू होती. अखेर सायंकाळी अर्ज क्रमांकाच्या प्राधान्यक्रमानुसार चिन्हवाटप झाले अन् शुक्रवारपासून प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे.
प्रचाराचा पाऊस पडतोय जोरात
By admin | Updated: July 25, 2015 04:44 IST