पिंपरी : आकुर्डीतील पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) कार्यालय तीन महिने पूर्ण होण्यापूर्वीच पुण्यात हलविण्यात आले आहे. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय अद्यापही आकुर्डीतील प्राधिकरण कार्यालयातच आहे. पुणे जिल्ह्याचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पीएमआरडीएचे कार्यालय आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात सुरू करण्यात आले. १ मे रोजी महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले. इमारतीतील ‘ए’ ब्लॉकमधील पहिल्या मजल्यावर विविध कामकाजास सुरुवातही झाली होती. याच मजल्यावर ‘सीईओं’चेही कार्यालय तयार करण्यात आले होते. मात्र, ते छोटे असल्याने सातव्या मजल्यावरील सीईओंची बैठक व्यवस्था करण्यात आली.जिल्ह्यातील महत्त्वाचे कार्यालय शहरात आल्याने शहराला एक वेगळीच ओळख मिळाली. याचा शहरवासीयांनाही आनंद झाला होता. बांधकाम परवानगीसह विविध परवानग्या एकाच ठिकाणाहून मिळणार असल्याने पिंपरी-चिंचवडसह परिसरातील नागरिकांसाठी अधिक सोयीचे होते. मात्र, येथील कार्यालय पुण्यातील औंधमधील सयाजीराव गायकवाड उद्योग भवन येथे स्थलांतरित झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. आता आकुर्डी कार्यालयातील पहिला मजला पूर्णत: रिकामा करण्यात आला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी शहरात क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्याचे नियोजित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पीएमआरडीए कार्यालय औंधला
By admin | Updated: August 1, 2015 04:32 IST