पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते पिंपरी या मार्गावर महामेट्रोचे काम सुरू आहे. यामध्ये पिंपरीतील महापालिका भवनासमोरील, तसेच दापोडी येथील स्टेशन प्राधान्याने पूर्ण करणार असल्याची माहिती मेट्रो प्रकल्पाच्या रिच वनचे कार्यकारी संचालक गौतम बिºहाडे यांनी दिली. यासह पिंपरी ते दापोडी हा मेट्रोमार्ग या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महामेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून स्वारगेट ते पिंपरी या ‘रिच वन’मधील पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडीच्या हॅरिस पुलापासून चिंचवड येथील संत मदर तेरेसा पुलापर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. यामधील दापोडी व महापालिका भवनासमोरील स्टेशनचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाणार आहे. त्या पाठोपाठ फुगेवाडी व संत तुकारामनगर येथील स्टेशनचे कामही पूर्ण करण्याचे नियोजित आहे. दापोडी व महापालिका भवनासमोरील स्टेशन यामधील अंतर ६.७ किलोमीटर असून, यादरम्यान मेट्रोची सहा स्टेशन असतील. यासह दापोडी ते पिंपरी या मार्गावर या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत मेट्रो धावेल, या दृष्टीने कामाचे नियोजन सुरु असल्याचेही बिºहाडे म्हणाले.पाच मीटरपेक्षा अधिक खोल खड्डा करायचा असल्यास पायलिंग रिंग पद्धतीने करणे आवश्यक असते. दरम्यान, सध्याच्या कामामध्ये ४० ठिकाणी पायलिंग रिंगचे काम करणे बाकी आहे. नाशिक फाटा येथील दुर्घटनेनंतर तेथील मशिन हटविण्यात आले असून, चिंचवड येथील संत मदर तेरेसा उड्डाणपुलाजवळ सुरू असलेल्या पायलिंग रिंग मशिनच्या साहाय्यानेच पुढील पायलिंग रिंगचे कामकाज केले जाणार असल्याचे बिरहाडे यांनी सांगितले.