बावडा : ‘झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोज्वळा! बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर, माहेर संताचे नामया स्वामी केशवांचे’ काही अंतरावर राहिलेल्या पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेल्या तुकाराम महाराज पालखीतील वैष्णवांनी ज्ञानबा तुकारामाच्या गजरात आज सराटी (ता़ इंदापूर) येथून पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम आटोपून सोलापूर जिल्हयात प्रवेश केला़ काल रात्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सराटी येथे सायंकाळी नीरा नदीकाठी विसावला होता़. रात्रभर भजन, कीर्तन, भारुडे यामुळे प्रतिपंढरीचे स्वरूप आले होते़ सकाळी हरिनामाच्या गजरात तुकारामांच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात आले़. त्यानंतर पालखीची विधिवत पूजा करून सकाळी ८ वाजता निरोप देण्यात आला़ या वेळी जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार सूर्यकांत येवले, गटविकास अधिकारी वडापुरे, तालुका आरोग्याधिकारी महाजन यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते़ पालखी पुणे व सोलापूर जिल्ह्यातील सीमेवर असणाऱ्या नीरा नदीवरील पुलावरून मार्गस्थ झाली़ सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार हनुमंत डोळस, जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे, तहसीलदार सुरेखा दिवटे आदींनी पालखीचे स्वागत केले़ (वार्ताहर)
पादुकांना नीरास्नान
By admin | Updated: July 23, 2015 04:39 IST