PCMC: पिंपरी-चिंचवडमधील ४२६ आस्थापनांना पालिकेचा दणका, २ हजार ४२३ मालमत्ता धोकादायक
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: January 31, 2024 06:56 PM2024-01-31T18:56:02+5:302024-01-31T18:57:00+5:30
पिंपरी : अग्निसुरक्षेच्या बाबतीत नियमांचे पालन न केल्याबद्दल महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ४२६ व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत. सर्वेक्षणाद्वारे अग्निप्रतिबंधक ...
पिंपरी : अग्निसुरक्षेच्या बाबतीत नियमांचे पालन न केल्याबद्दल महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ४२६ व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत. सर्वेक्षणाद्वारे अग्निप्रतिबंधक यंत्रणांची पूर्तता न करणाऱ्या आस्थापना मालकांवर कारवाई करण्यात येत असून अनेकांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती उपायुक्त मनोज लोणकर यांनी दिली.
अग्निसुरक्षा नियमांचे बळकटीकरण व्हावे, यासाठी महापालिकेने महिला बचतगटांच्या मदतीने शहरात सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील ४३ हजार ९२५ व्यावसायिक आस्थापनांनी अग्निसुरक्षा उपायांबाबत अपूर्ण माहिती सादर केली होती. त्यानंतर परत त्यांच्याकडून सर्व्हेक्षण करण्यात आले होते. अग्निसुरक्षेविषयी सूचनांचे पालन करण्यास टाळाटाळ अथवा दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई महापालिकेकडून करण्यात येणार आहे. त्याची पहिली पायरी म्हणून महापालिकेने नोटिसा पाठवण्यास सुरू केल्या आहेत.
महिलांद्वारे आस्थापनांचे सर्वेक्षण
महिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे अंतर्गत अधिकृत स्वयं-सहायता गटातील महिलांद्वारे शहरातील विविध आस्थापनांचे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्व्हेक्षणांतर्गत व्यावसायिक इमारतींमधील अग्निसुरक्षेच्या पायाभूत सुविधांचे मूल्यांकन करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत सर्वेक्षण केलेल्या सुमारे ४३ हजार मालमत्तांपैकी २४२३ धोकादायक मालमत्ता सापडल्या आहेत. उर्वरित मालमत्तांच्या अग्निसुरक्षेबाबतच्या पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण अद्याप सुरू आहे.
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे. लायसन्सप्राप्त एजन्सीकडील विहित नमुन्यातील प्रमाणपत्र महापालिका अग्निशामक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. याची संपूर्ण जबाबदारी त्या इमारतीचा मालक किंवा तिचा वापर करणाऱ्या भोगवटादाराची आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या व्यावसायिक, मिश्र इमारती यांचे मालक, भोगवटादार यांना अग्निसुरक्षिततेच्या अनुषंगाने काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
- मनोज लोणकर, उपायुक्त, महापालिका