PCMC: ४३ हजार व्यावसायिकांनी आगीबाबत भरली अपूर्ण माहिती; पालिकेचे सर्वेक्षण पूर्ण कधी होणार?

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: January 2, 2024 10:14 AM2024-01-02T10:14:30+5:302024-01-02T10:15:06+5:30

अग्निसुरक्षा उपायांमधील अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी महापालिका सर्वेक्षण करीत आहे...

PCMC: 43 thousand professionals filled incomplete information about fire; When will the municipal survey be completed? | PCMC: ४३ हजार व्यावसायिकांनी आगीबाबत भरली अपूर्ण माहिती; पालिकेचे सर्वेक्षण पूर्ण कधी होणार?

PCMC: ४३ हजार व्यावसायिकांनी आगीबाबत भरली अपूर्ण माहिती; पालिकेचे सर्वेक्षण पूर्ण कधी होणार?

पिंपरी : अग्निसुरक्षा नियमांचे बळकटीकरण व्हावे, यासाठी महापालिकेने महिला बचतगटांच्या मदतीने शहरात सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील ४३ हजार ९२५ व्यावसायिक आस्थापनांनी अग्निसुरक्षा उपायांबाबत अपूर्ण माहिती सादर केली असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे बचतगटांनी सर्वेक्षण कसे केले, असा सवाल उपस्थित होत आहे.

अग्निसुरक्षा उपायांमधील अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी महापालिका सर्वेक्षण करीत आहे. अग्निसुरक्षेविषयी अपुरी माहिती दिलेल्या आस्थापनांनी परिपूर्ण माहिती दिली पाहिजे. अग्निसुरक्षेविषयी सूचनांचे पालन करण्यास टाळाटाळ अथवा दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करणे किंवा त्या बंद करणे अशी नियमाधीन कारवाई होऊ शकते. पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व व्यावसायिक आस्थापना मालक आणि भोगवटादारांनी परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी केले आहे.

लिंक पाठवायची तर सर्वेक्षण कशाला?

अपूर्ण माहिती देणाऱ्या संबंधित आस्थापनांनी सर्वेक्षणावेळी दिलेल्या मोबाइल क्रमांकावर महापालिकेच्या वतीने लिंक पाठविण्यात आली आहे. त्याद्वारे आवश्यक माहिती संबंधित आस्थापनांनी त्वरित भरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. आस्थापनांचे मोबाइल नंबर महापालिकेकडे असताना सर्वेक्षणाचा घाट का घातला, असा सवाल उपस्थित होत आहे.

बचतगटांनी भरली अर्धवट माहिती....

महिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे यांच्यामार्फत बचतगटांमधील महिलांनी केलेल्या आग प्रतिबंधक सर्वेक्षण सुरू आहे. या महिलांनी आस्थापनांनी आवश्यक माहितीची पूर्तता करणे आवश्यक आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अग्निसुरक्षा पायाभूत सुविधांचे मूल्यांकन होणार आहे. मात्र, काही आस्थापनांनी अपूर्ण माहिती दिली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सर्वेक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.

अग्निसुरक्षा ही महत्त्वाची बाब असून, यामध्ये नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. आग प्रतिबंधक उपायांमधील त्रुटींकडे दुर्लक्ष करणे कोणालाही परवडणारे नाही. त्यामुळे अग्निसुरक्षा उपायांचे पालन सर्व आस्थापनांनी केले पाहिजे. सर्व आस्थापना आवश्यक सुरक्षा मानकांचे पालन करतात किंवा नाही याची खात्री सर्वेक्षणाद्वारे केली जात आहे.

- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

Web Title: PCMC: 43 thousand professionals filled incomplete information about fire; When will the municipal survey be completed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.