किवळे : परिसरात बुधवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास एक सुमो व वीस-पंचवीस दुचाकीवरून आलेल्या सुमारे पन्नास ते साठ तरुणांच्या टोळक्याने हातात काठ्या व तलवारी घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वार करून एकाला जखमी केले असून, औंध येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. श्रीनगर भागात एका दुचाकीचे नुकसान केले आहे. देहूरोड पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.अचानकपणे एकापाठोपाठ एक मोटारी आल्या. सुमारे वीस- पंचवीस दुचाकीवरून सुमारे पन्नास ते साठ तरुणांचे टोळके, हातात काठ्या व तलवारी घेऊन आले. विकासनगर येथून जात असताना सुरुवातीला त्यांनी गहुंजेतील एका फोटो स्टुडिओचे नुकसान केले. त्यांनतर पुढे जात असताना विकासनगर भागातील श्याम सौदागर शिंदे ( वय २३ ) या युवकाला पाठीवर व हातावर वार करून टोळक्याने त्याला जखमी केले. हल्ल्यात त्याचे एक बोट तुटले असून, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणांचे टोळके दत्तनगरहून मुकाई चौकाच्या दिशेने गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुचाकीचे नुकसान केल्याबाबत विजय मोरे यांनी अज्ञात आरोपींविरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. टोळक्याने दहशत माजविल्याने विकासनगर भागातील रहिवासी भयभीत झाले होते. विकासनगर भागात वर्दळीच्या रस्त्यावरून तलवारी, काठ्या व बांबू घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळक्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी देहूरोड उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पानसरे यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)
विकासनगरमध्ये टोळक्याची दहशत
By admin | Updated: April 8, 2016 00:35 IST