काळेवाडी : शहरीकरणामुळे शेतीखालील जमीन कमी होऊन त्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहत असतानाही काळेवाडीतील काही शेतकऱ्यांनी सिमेंटच्या जंगलातही पारंपरिक शेती टिकवून ठेवली आहे. गेल्या १०-१५ वर्षात परिसराचा झपाट्याने विकास होत गेल्यामुळे जमिनीला सोन्याचा भाव आला. त्यामुळे अनेकांनी शेतजमिनी विकल्या. पूर्वीच्या शेतजमिनींवर मोठमोठ्या सोसायट्या, बंगले व उंच इमारती दिसत आहेत. परंतु येथील तापकीर मळ्यात आजही पारंपरिक शेती केली जात असून, येथील प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर तापकीर हे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, ऊस यांसारखी पिके घेत आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढे धान्य व भाजीपाला ते पिकवितात. भातलावणी, काढणी व इतर कामासाठी वेळेवर मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना मजुरांची कमतरता नेहमीच भासत असते. मावळ, मुळशी व इतर भागातून काही अनुभवी मजूर उपलब्ध करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यही विरंगुळा म्हणून आवडीने भातलावणीसाठी मदत करीत असतात. त्यामुळे सिमेंटच्या जंगलातही शेती व विविध पिके पाहण्याचा अनुभव परिसरातील नागरिक घेत असतात. (वार्ताहर)
सिमेंटच्या जंगलात भातशेती
By admin | Updated: August 4, 2015 03:37 IST