पिंपरी : चलनातून पाचशे व हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर नागरिकांनी जुन्या नोटा बदलण्यासाठी बँक आणि पोस्टात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. त्यानुसार पोस्टात गेल्या आठ दिवसांत सुमारे १ कोटी १२ लाखांच्या जुन्या नोटा नागरिकांनी जमा केल्या आहेत, तर पोस्टाकडून आतापर्यंत जुन्या नोटांच्या बदल्यात २५ लाखांचे वाटप करण्यात आले आहे.गेल्या आठवड्यात हजार व पाचशेच्या नोटा चलनातून बाद झाल्याने, नागरिकांनी पहिल्या दिवसापासूनच पोस्टामध्ये जुन्या नोटा बदलण्यासाठी गर्दी केली होती. सुरुवातीला दोन दिवस नवीन नोटा उपलब्ध न झाल्याने पोस्टाकडून फक्त ग्राहकांचे पैैसे जमा केले गेले. मात्र, तिसऱ्या दिवसापासून नवीन नोटा उपलब्ध झाल्याने ग्राहकांनी नोटा बदलण्यासाठी एकच गर्दी केली आहे. दोन हजारांच्या नवीन नोटाबरोबरच ग्राहकांना सुटे पैैसे देण्यासाठी शंभर रुपयांच्या सुट्या नोटाही देण्यात येत होत्या. सकाळपासूनच नागरिकांनी पाचशे व हजारांच्या नोटा बदलण्यासाठी रांगा लावल्या होत्या. दोन हजारांच्या नोटाबरोबरच ग्राहकांना सुटे पैैसे देण्यासाठी शंभर रुपयांच्या नोटांचेही वाटप करण्यात आले असून, आठवडाभरात शंभर रुपयांच्या नोटांची १२ लाखांची रोकड, तर ५० रुपयांच्या नोटांची एक लाखांची रोकड वाटप करण्यात आली. पोस्ट कार्यालयामुळे बँकांच्या कामकाजावरील ताण काहीअंशी कमी झाला. तसेच काही नागरिक पोस्टात नवीन ठेवींचे खाते उघडूनही जुन्या नोटा बदलावित आहेत. त्यामुळे जुन्या नोटांची रक्कम काही दिवसांमध्ये अधिक वाढणार असल्याची महिती सब पोस्ट मास्तर शिवाजी नाईकरे यांनी दिली. (प्रतिनिधी)
एक कोटी जमा, २५ लाखांचे वाटप
By admin | Updated: November 16, 2016 02:18 IST